(आंध्रप्रदेश)
गणपती हे सर्वांचेच आवडते दैवत आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात ही गणेशपूजेने केली जाते. घरामध्ये संपन्नता, समृद्धी, सौभाग्य आणि पैसा सतत नांदत रहावा याकरिता गणेशाची पूजा केली जाते. देशापरदेशात गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. या एका गणेश मंदिरात स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचा आकार नियमित बदलत राहतो.
आंध्रप्रदेशात खास मंदीर
आंध्रप्रदेशातील चित्तूरमध्ये गणपतीचे एक खास मंदीर आहे. या प्राचीन मंदिराची स्थापना चोळ राजांनी केली होती. या मंदिरात अनेक अद्भूत गोष्टी आणि चमत्कार पहायला मिळतात. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.
कनिपक्कम गणेश मंदिर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरात गणेशमूर्तींचा आकार नियमित बदलत राहतो. प्रामुख्याने गणपतीच्या पोटाचा आणि पायाचा आकार बदलतो. हे गणेशमंदीर विशाल नदीच्या मधोमध वसलं आहे. या गणपतीसाठी खास कवच बनवण्यात आलं होतं. मात्र ते घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते गणपतीच्या मापात बसलंचं नाही.
या मंदिराची निर्माण अशीही कथा अत्यंत रोचक आहे. कथेनुसार या ठिकाणी तीन भाऊ वास्तव्यास होते. या तिघांमधील एक मुका, दुसरा बहिरा आणि तिसरा अंध होता. तिघांनीही उदरनिर्वाहासाठी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. जमिनीवर शेती करण्यासाठी पाण्याची गरज होती. यामुळे तिघांनीही या ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरु केले. काही काळानंतर जमिनीतून पाणी निघाले. त्यानंतर आणखी खाली खोदल्यानंतर एक दगड दिसून आला. तो दगड काढल्यानंतर तेथून रक्ताची धार निघाली. थोड्याचवेळात संपूर्ण पाणी लाल झाले, त्याचबरोबर एक चमत्कारही झाला. त्या तिघांना तेथे श्रीगणेशाची मूर्ती दिसली. या मूर्तीचे दर्शन घेताच तिन्ही भावांचे अपंगत्व दूर झाले. ही बातमी गावातील रहिवाशांना समजताच ते सर्वजण हा चमत्कार पाहण्यासाठी तेथे गोळा झाले. त्यानंतर सर्व लोकांनी प्रकट झालेल्या गणेश मूर्तीची तेथे पाण्यातच स्थापना केली. त्यानंतर 11 व्या शतकात चोळ राजा कुलोतुंग चोळ प्रथम यांनी या मंदिराचे निर्माण केले.