लांजा : शहरातील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग ९ मधील नागरिकांनी तसेच नगरसेवक रफिक नेवरेकर यांनी प्रभाग मधील नागरिकांची विजेच्या प्रवाहामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. परंतु दोन महीने होऊन सुद्धा महावितरण कार्यालयाकडून तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याने महावितरण कार्यालय फक्त वीजबील वसुलीसाठी आहे का? असा सवाल रफिक नेवरेकर यांनी केला आहे.
विजेचा प्रवाहाबाबतीत लांजा शहरातील नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील प्रभाग ९ मधील विजेचा प्रवाहाची समस्या नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी झाली आहे. प्रभाग मधील तेलीवाडी मार्गावर असणाऱ्या विजेचा खांबावरील ट्रान्सफॉर्मर कमी व्होलटेजचा असून विजेचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने त्याचा परिणाम घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होऊन उपकरणात बिघाड होण्यास सुरुवात झाल्याने प्रभाग मधील नागरिकांनी महावितरण कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली होती. परंतु त्याची कोणतीही दखल महावितरण कार्यालयकडून घेतली गेली नाही. यामुळे नागरिकांनी ही बाब नगरसेवक रफिक नेवरेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित विषयाची माहीती घेऊन रफिक नेवरेकर यांनी स्वतः महावितरण कार्यालयमध्ये तक्रार दाखल केली होती. दोन महीने होऊन गेला तरी एकही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केलेली नाही किंवा फिरकले देखील नाही.
महावितरण कार्यालयात तक्रारी देऊनही महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रभाग मधील घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, एअरकंडिशन, इनव्हर्टर, टिव्ही, लँपटॉप सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडण्याचे प्रकार होऊ लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री.वैभव सावंत व सहायक अभियंता श्रीमती.मनाली माळी यांच्याशी चर्चा केली असता नेहमीच उडवाउडवीची असमाधानकारक उत्तरे दिली जातात. परंतु हेच अधिकारी विजबील एक दिवस देखील भरण्यास उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना पाठवून विजेचे कनेक्शन बंद करावयास सांगतात. वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा साधी दखल घेतली जात नाही मात्र विज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया तत्काळ केली जाते. नागरिकांच्या होणाऱ्या अडचणीकडे दुर्लक्ष करुन मनामानी कारभार सुरु आहे असा आरोप रफिक नेवरेकर यांनी केला आहे.
तसेच आतापर्यंत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी महावितरण अधिकारी घेतील का? असा देखील सवाल रफिक नेवरेकर यांनी केला. तसेच यापुढे प्रभाग मधील नागरिकांचे विजेचा प्रवाहामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीला व कोणत्याही प्रकारच्या जिवित हानीला सर्वस्वी जबाबदार लांजा महावितरण कार्यालय असेल असे या आधीच निवेदनात नमूद केले आहे .