(नवी दिल्ली)
येत्या ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत होणा-या जी-२० शिखर परिषदेत १९ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ब्रिटन आणि जपानच्या पंतप्रधानांसह अमेरिका आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही यात सहभागी होणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी भारत विस्तृत व्यवस्था करत आहे. काही दिवसांवर आलेल्या या जी-२० परिषदेपूर्वी पंतप्रंधान नरेंद्र मोदींनी वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल, भ्रष्टाचार आणि जातिवादाला देशात स्थान राहणार नाही, असा विश्वास मुलाखती दरम्यान पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तसेच, जी-२० परिषदेमुळे देशाला झालेल्या फायद्यांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केले आहे.
भारताच्या जी-२० अध्यक्षपदामुळे अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत आणि यापैकी काही माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जगाचा जीडीपी-केंद्रीत दृष्टिकोन आता मानव-केंद्रीत दृष्टिकोनात बदलत आहे आणि यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तर सबका साथ, सबका विकास हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरू शकते असेही मोदींनी यावेळी म्हटले आहे. २०४७ पर्यंत भारताचा सर्वांगीन विकास होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. भारतात भ्रष्टाचार आणि जातीवादाला स्थान नसेल, असेही ते म्हणाले. तर, जगाने जी-२० मध्ये आमचे शब्द आणि दृष्टिकोन केवळ कल्पना म्हणून नाही तर भविष्यासाठी एक रोडमॅप म्हणून पाहिल्याचंही मोदींनी स्पष्ट केले. पुढे मोदी म्हणाले, फार पूर्वीपासून भारताकडे शंभर कोटी भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिले जात होते, पण आता भारत हा शंभर कोटी महत्त्वाकांक्षी मनांचा आणि दोन अब्ज कुशल हातांचा देश बनला आहे.
भारतीयांना विकासाचा पाया घालण्याची आज मोठी संधी आहे, जी पुढील हजार वर्षे स्मरणात राहील, असं मोदी म्हणाले. सध्याचा भारताचा विकास पाहता भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुन्हेगारी हेतूंसाठी आयसीटीचा वापर रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, सायबर धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे. सायबर दहशतवाद, मनी लाँड्रिंग ही फक्त ऑनलाईन धोक्याची झलक आहे. बेकायदेशीर आर्थिक कारवाया आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सायबर क्षेत्राने एक नवा पाया रचल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादी त्यांचे नापाक मनसुबे पार पाडण्यासाठी ‘डार्कनेट’, ‘मेटाव्हर्स’ आणि ‘क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म’ वापरत आहेत आणि राष्ट्रांच्या सामाजिक जडणघडणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी केला.