(पुणे)
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट बाहेर पडून सरकारमध्ये सामील झाल्याच्या घटनेला दीड महिना होऊन गेला असला तरी राष्ट्रवादीचा कोणता आमदार कोणत्या गटात असा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे अजित पवार-शरद पवारांच्या भेटीगाठी होत असल्यामुळे संभ्रम वाढत आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या गोंधळात भर घालणारे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही, अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असे त्या पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
खासदार सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. ही आमच्या पक्षाची सध्याची वस्तुस्थिती आहे. आमच्या पक्षाची भाजपबरोबर कोणतीही आघाडी नाही, युती नाही, काही नाही. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते आमच्या जेव्हा लक्षात आले, तेव्हा कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्याबद्दल (अजित पवार गट) जे काही म्हणणे मांडायचे होते, ते आम्ही मांडले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. आम्ही कुठल्याही गुप्त बैठका केलेल्या नाहीत. पवार आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्माआधीपासून मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात कसली चोरी आणि भीती?
‘अजित पवार यांचे पक्षातील सध्याचे स्टेटस काय?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्या म्हणाल्या की, अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतलेली आहे. त्याची तक्रार आम्ही महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षांकडे दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.
दरम्यान, ‘भाजपने आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्यासाठी प्रयत्न केले. भाजप त्यांची रणनीती सतत बदलत राहिला, शरद पवारांचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने भाजपकडून सातत्याने ऑफर येत होत्या. मात्र त्यांनी कधीही भाजपशी हातमिळवणी केली नाही. तिसऱ्या वेळी भाजपने सखोल रणनीती आखली आणि त्यांना यश आले, ते राष्ट्रवादीला फोडण्यात यशस्वी झाले. राष्ट्रवादीचा गट सत्तेत आहे, पण तांत्रिकदृष्ट्या पक्षात फूट नाही,’ असे याआधी सुप्रिया सुळे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, सुप्रिया काय म्हणाल्या मला माहिती नाही. राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व अजित पवार महाराष्ट्रात करत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारमध्ये राहून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून चांगले काम करायचे आहे.