( रत्नागिरी /प्रतिनिधी )
पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफनभूमित BSNL टॉवर उभारण्यावरून जिल्ह्यातील बौद्ध समाज आक्रमक होत उद्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण छेडण्यात येणार होते. मात्र हे उपोषण तूर्तास अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन स्थगित करण्यात आले आहे असे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वळके दफनभूमी ही १२ गुंठे क्षेत्रात आहे. याठिकाणी टॉवर उभारण्यास स्थानीक जनतेचा प्रचंड विरोध असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत होते. प्रशासनातर्फे तीन वेळा जागेची मोजणी करण्यासाठी पथक पाठविण्यात आले. मात्र स्थानिक जनतेने त्यांना दोन वेळा संविधानिक मार्गाने विरोध करत परतून लावले होते. तीन दिवसांपूर्वी पुन्हा मोजणी पथक दफनभूमीत दाखल झाले. त्यावेळीं मात्र ग्रामस्थांसमोर जमिनीची मोजणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीने BSNL कंपनीच्या नावे केलेले २ गुंठे क्षेत्र हे दफनभूमीत मिळत नसल्यामुळे अखेर दुसऱ्या जागेचा वापर करण्यास मार्ग मोकळा झाल्याचे ग्रामस्थांना समजले.
दरम्यान या प्रकरणाबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्वातंत्रदिनी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला होता. मात्र आज सोमवारी सायंकाळी अप्पर तहसीलदार राकेश गीड्डे यांनी वळके दफनभूमीत दाखल होत जमिनीची पाहणी केली. सर्वच ठिकाणी समाधी उभारल्या आल्याने जागाच शिल्लक नसल्याचे त्यांनी पाहिले यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली व चर्चेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावर ग्रामस्थांनी प्रशासकीय सक्षम अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाकडून योग्य तो न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेची जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असा गर्भित इशारा देखील भारतीय बौद्ध महासभेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिला आहे.
आमची मागणी इतकीच आहे की, आम्हाला १२ गुंठे जागा मृतांना दफन करण्यात कमी पडत आहे.ती जागा आमच्या नावावर करावी. यातच प्रशासनाने bsnl कंपनीचा टॉवर दफनभूमीत उभारण्याचे नियोजन केल्याने हे आम्हा ग्रामस्थांना पटलेले नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबला लागला होता. आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी तहसीलदार गिड्डे साहेब आम्हा ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचे ठरविले आहे असे स्थानिक ग्रामस्थ मुकुंद सावंत यांनी सांगितले आहे.