रत्नागिरी : दिवाळी अंक मराठी भाषेची साहित्यिक ठेव आहे. दिवाळी अंक लेखकाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. ‘मराठीमध्ये दिवाळी अंकांची अतिशय समृद्ध परंपरा आहे’, ‘इतर कुठल्याही भारतीय भाषेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना सा. बलवंतच्या दिवाळी अंकाचे महत्व रत्नागिरीवासीयांसाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कोकणचे अभ्यासक विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.
साप्ताहिक बलवंतच्या दीपावली अंकाचे प्रकाशन हॉटेल मथुरा येथे करताना ते बोलत होते. विधिज्ञ पाटणे म्हणाले की, बालकवी, गडकरी, कुसुमाग्रज, पुल देशपांडे, पु भा भावे, व्यंकटेश माडगुळकर आदी लेखकानी दिवाळी अंकापासून आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला .”आवाज ” दिवाळी अंकाचे पहिले तीन वर्ष मुखपृष्ठ बाळासाहेव ठाकरे करीत असत. १९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचे संपादक काशिनाथ रपुनाथ आजगावकर उर्फ का. र. मित्र यांनी प्रकाशित केला. सध्या साधारणपणे ४०० च्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात.
ऍड. विलास पाटणे म्हणाले की, मी बलवंत मध्ये पहिला लेख लिहिला होता. आज त्याला 50 वर्षे झाली आहेत. आजच्या डिजिटल युगात प्रिंट मीडियाचे दिवस संपले असे म्हणतात, पण ते चूक आहे, असे अस्तित्व संपणार नाही. सर्व माध्यमात आता क्राइम विषयाला जास्त महत्त्व दिले जाते. परंतु जपानमध्ये अर्ध्या ओळीची बातमी नसते, नवीन काय, शोध, प्रयोग आदीला याला जास्त महत्त्व दिले जाते. त्याप्रमाणे सकारात्मक लिखाण केले पाहिजे.
बाळ माने यांनी नव्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. हा चांगला मार्ग आहे, डिजिटल माध्यमातही त्यांनी मुशाफीरी करावी, असे आवाहन विलास पाटणे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुजन शेंडये, बलवंतच्या कार्यकारी संपादक सौ. माधवी माने, संपादक तथा माजी आमदार बाळ माने आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे उपस्थित होते.
यावेळी श्री. बाळ माने म्हणाले, काल लक्ष्मी पूजन केले, आज हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस दीपावली पाडवा आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनामुळे सर्वजण त्रस्त होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील शास्त्रज्ञानी लस शोधून नवी पहाट आणली.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीत पहिले दर्पण सुरू केले. त्यांचा वारसा साप्ताहिक बलवंतने पुढे सुरू केला. कै गजानन पटवर्धन यांनी बाळ गंगाधर टिळकांच्या नावाने बलवंत 1923 मध्ये सुरू केले. स्वातंत्र्ययुध्दात बलवंतला दंड झाला होता. त्याकाळी 4 हजार रुपये दंड ब्रिटिश सरकारला सर्व लोकांनी जमा करून भरला, एवढा जाज्वल्य इतिहास आहे.
बलवंतचे योगदान महत्वाचे आहे, स्वातंत्र्य युद्ध, संयुक्त महाराष्ट्र आणि पुढे आणीबाणी या सर्व लढ्यात बलवंतने योगदान दिले. स्पर्धा, अनेक आव्हाने होती. शतकाकडे वाटचाल करणारे साप्ताहिक आहे. 8 पानांचा अंक सध्या देतो. वेबसाइट, यु ट्यूब चॅनेल असे डिजिटल रूप केले. अमेझॉनवर इ पब्लिकेशन उपलब्ध आहे. वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी योगदान देत आहोत. बलवंतला आता ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळालं आहे.
बलवंतचे आता इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशन करण्याचा मानस आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक अरविंद कोकजे यांनी बलवंतच्या इतिहासाचे सदर सुरू केले आहे, त्याचे पुस्तक करून प्रकाशन 26 जानेवारीला करण्याचा मानस बाळ माने यांनी व्यक्त केला. दीपावली अंकासाठी गेले दोन तीन महिने मदत करणाऱ्या सर्वांचे आभार बाळ माने यांनी मानले.
अनिल दांडेकर म्हणाले की, पूर्वीच्या काळात दिवाळी अंकासाठी नंबर लावावा लागे, अंक वाचायला उड्या पडायच्या. हा पूर्वीचा काळ गेला. आज मला बलवंत मध्ये लिहायला मिळाले, त्यानिमित्ताने नवीन लेखन झाले. छापणारे आहेत म्हणून लिहीणाऱ्याच्या शब्दाला किंमत आहे. आज रंगभूमी दिन आहे. रंगमंच सजवणारे आहेत म्हणून अभिनय करणाऱ्यांना किंमत आहे.
सुजन शेंडये यांनी सांगितले की दिवाळी अंकात प्रसिध्द होणार हा माझा पहिला अंक आहे. बलवंतच्या अंकात त्याला संधी मिळाली.
सूत्रसंचालन सौ. मानसी मुळ्ये यांनी केले. रत्नागिरी शहरातील पत्रकार, ज्येष्ठ लेखक, मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.