(रत्नागिरी)
शहराजवळील उत्कर्षनगर- कुवारबाव येथील घरफोडी प्रकरणी एका महिलेसह चौघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी या घरफोडीत ३३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. शुक्रवारी न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जुनेद जाफर मस्तान, रेहान बाबामियाँ मस्तान, वसीम नजीर सोलकर (दोघेही रा. मिरकरवाडा-रत्नागिरी), फईमिदा इब्राहिम दर्वेश नॅनोसिटी- खेडशी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. सदर प्रकार १५ ते १६ जुलै दरम्यान उत्कर्षनगर- कुवारबाव येथे घडला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कुवारबाव- उत्कर्षनगर येथील प्रतिभा भिमराव पाटील यांच्या घरात भाड्याने राहातात. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी कापून संशयित चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील टीव्ही, २० हजाराचे एक सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजाराची २ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २ ग्रॅम वजनाची २ हजाराची अंगठी, एक हजार रुपयांची चिल्लर असा ३३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संशयितांना न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.