(मुंबई)
यंदा मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कुडाळ दरम्यान विशेष १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त २०८ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वेने ४० विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी एकूण २६६ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.
गाडी क्रमांक ०११८५ एलटीटी-कुडाळ रेल्वेगाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दर सोमवार, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी) येथून रात्री १२.४५ वाजता रेल्वेगाडी सुटून कुडाळ येथून सकाळी ११.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११८६ कुडाळ येथून दर मंगळवारी, गुरुवारी, रविवारी दुपारी १२.१० वाजता सुटेल आणि रात्री १२.३५ वाजता एलटीटी येथे पोहचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा असेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.