( संगमेश्वर / प्रतिनिधी )
पटवर्धन हायस्कूल येथील कलाशिक्षक चित्रकार रुपेश पंगेरकर यांची महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या कोकण विभागीय सहसचिव या पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पंगेरकर यांच्या निवडीनंतर त्यांचे राज्य उपाध्यक्ष बी. जी. सामंत, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख , उपाध्यक्ष स्वरूपकुमार केळसकर , सचिव राजन आयरे यांच्यासह जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कलाशिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
रुपेश पंगेरकर हे एक प्रयोगशील कलाशिक्षक असून रत्नागिरी येथील नावाजलेल्या पटवर्धन हायस्कूल मध्ये ते गेली २५ वर्षे कलाशिक्षक म्हणून काम करत आहेत . शासकीय रेखाकला परीक्षांचा निकाल सातत्याने १०० टक्के लागणे यासह राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी येणे हे पंगेरकर यांचे खास वैशिष्ट्य आहे . सहयोगी कलाशिक्षक मित्रांसोबत मुंबई येथे आपल्या चित्रांची प्रदर्शने भरविण्याची देखील पंगेरकर यांना आवड आहे . राज्य अभ्यासक्रम मंडळावर काम पहाणे यासह कला विषयाचा तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे .
दरवर्षी भरणाऱ्या कलाशिक्षकांच्या राज्य अधिवेशनामध्ये त्यांची उपस्थिती असते आणि या अधिवेशनाचा लाभ आपल्या जिल्ह्यातील कलाशिक्षकांना कसा होइल यासाठी पंगेरकर हे प्रयत्नशील असतात . जिल्हा आणि राज्य संघटनेच्या विविध आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला असून कलाविषयासाठी त्यांची सातत्यपूर्ण असणारी धडपड पाहून रुपेश पंगेरकर यांची राज्य संघटनेचे विभागीय सहसचिव म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे . आपल्यावर जिल्हा कलाध्यापक संघटनेने दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू तसेच राज्य अध्यक्ष नरेंद्र बारई , उपाध्यक्ष बी. जी .सामंत आणि पदाधिकारी यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेला रूपेश पंगेरकर यांनी धन्यवाद दिले आहेत.