(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेले अनेक दिवस पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफन भूमीत BSNL मोबाईल टॉवर उभारण्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. स्थानिक जनतेचा विरोध प्रखर विरोध असतानाही पुन्हा एकदा (शुक्रवारी, 21 जून 2023) BSNL कंपनीचे अधिकारी जमीन मोजणी करण्यासाठी आले होते. मात्र स्थानिकांनी या मोजणीला विरोध दर्शवत आलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा परतून लावले.
स्वतंत्र दफनभूमी मिळावी यासाठी अनेक गावांना वर्षांनुवर्षे झगडावे लागते. मात्र बौद्धवाडीची दफनभूमि हि स्वतंत्र जागा शासनाच्या मालकीची आहे. या जागेचा वापर ब्रिटिश काळापासून बौद्धवाडी दफनभूमी म्हणून करत असते. त्यामुळे या जागेत टॉवर न उभारता इतर शासकीय जागा गावात उपलब्ध आहेत, तिथे टॉवर उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहे. ग्रामस्थांचा विरोध असताना देखील मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा एकदा आल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती परशुराम कदम यांनी देखील घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना असे सांगितले की, मोजणीला किंवा टॉवरला लोकांचा विरोध नसून फक्त या जागेला स्थानिकांचा विरोध आहे. या भागात इतर शासकीय जागा देखील आहे. या दफनभूमीत अनेकांना दफन केले आहे. लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे पुन्हा उकरून त्यावर टॉवर उभारण्यास विरोध आहे. सदर विषय दिशा समितीच्या बैठकीत देखील खासदार विनायक राऊत यांच्यासमोर घेण्यात आला होता. या बैठकीला BSNL अधिकारी कुलकर्णी यांसह इतरही अधिकारी उपस्थित होते, असे पथकातील अधिकाऱ्यांना कदम यांनी सांगितले.
ग्रामपंचायत मार्फत सरपंच यांनी पाच ते सहा जागा दाखवल्या. एक महिन्यापूर्वी जे मोजणी पथक आले, त्यावेळी दफन भूमीच्या जागेसाठी आग्रही नसल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु आरक्षित नसलेल्या जागा उपलब्ध करून द्यावा असा शासनाचा आदेश असताना देखील आरक्षित जांगांवर अतिक्रमण करून शासनच आपला आदेश मोडित काढत आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान गावातील शासकीय भूखंड आहेत ते आम्ही दाखवतो, त्याठिकाणी टॉवर उभारावा असे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी वाडीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित जनतेचा पुन्हा एकदा रोष पाहून पथकातील अधिकाऱ्यांनी अखेर नरमेची भूमिका घेत तिथून मोजणीचे काम न करताच परतले.
ग्रामस्थांनी दिला इशारा
दफनभूमी वाचवण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलने , मोर्चे काढण्यास सरकारने प्रवृत्त करू नये असा इशारा ही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. दफनभूमीच्या जागेत टॉवर उभारण्यासाठी ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. इतर शासकीय जागा गावात असून देखील दफनभूमीच्या जागेत टॉवर उभारण्याचा हट्ट सरपंचानी का धरलाय? असा देखील सवाल ग्रामस्थांनी आता उपस्थित केला आहे. गावात जे शासकीय भूंखड आहेत त्यावर बिएसएनएलचा टॉवर उभारल्यास ग्रामस्थांचा विरोध नसेल अशी मागणी याआदी देखील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा असेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट
आक्रमक झालेल्या नागरिकांनी या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी एन देवेंद्र सिंग यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. येत्या मंगळवारी (२५ जुलै २०२३ रोजी) जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक नागरिक आपल्या व्यथा मांडणार आहे. मात्र या बैठकीत जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.