(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील देऊड- जाकादेवी विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले,कुणबी समाजातील प्रभावी, दानशूर व धाडसी व्यक्तिमत्त्व तसेच देऊड गावचे लोकप्रिय माजी सरपंच सुभाष धाला किंजळे यांचे रविवार दि. १६ रोजी रात्री उशिरा दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
दिवंगत सुभाष धाला किंजळे यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. प्रारंभीच्या काळात त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये, तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय जोमाने पक्ष संघटना वाढीसाठी तन-मन-धन अर्पण करून जिद्दीने काम केले.जाकादेवी येथील प्रसिद्ध राज हॉटेलचे ते मालक होय. सामाजिक कार्यकर्ते सुभाष किंजळे यांनी कुशल कर्तृत्वाने व नेतृत्वाने त्यांनी विविध संस्थांवर आवडीने व निष्ठेने कार्य केले.त्यांनी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.यामध्ये कुणबी समाज उन्नती संघ रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्षपद भूषविले, याशिवाय त्यांनी रत्नागिरी अर्बन बँकेचे अध्यक्षपद, देऊड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदावरही उत्कृष्ट काम केले. देऊड गावातील विकासकामांसाठी सुभाष किंजळे यांचा मोलाचा वाटा मानला जातो. रत्नागिरी तालुका कुणबी समाजन्नोती पतपेढीचे ते संस्थापक अध्यक्ष होय.त्यांची काम करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती.
देऊड गावात सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द फारच उल्लेखनीय ठरली. जाकादेवी हायस्कूलच्या दत्तक पालक योजनेचे ते देणगीदार होते. त्यांनी अनेकांना सढळ हस्ते मदतीचा हात दिला.सर्वांना सोबत घेऊन संघटित काम करण्यावर त्यांचा प्रामुख्याने भर असे. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातून दुःख व्यक्त होत आहे
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व विधायक अशा सर्व क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.