(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये अजित पवार यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एन्ट्री झाली आणि सगळी समिकरणंच बदलली आहेत. भाजप आणि शिंदे गाटत या एन्ट्रीने नाराजी असतानाच आता दुसऱ्या बाजूला थेट भाजप शिवसेना मंत्र्याच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत भाजप रस्त्यावर उतरला आहे. अब्दुल सत्तार यांनी खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकात जोरदार शक्तीप्रदर्शन आणि अर्धनग्न होत आंदोलन केले.
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठराव करत ठाणे जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाला सहकार्य करायचे नाही असा थेट ठराव केला होता. इतेकच नव्हे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार उभा करायचा अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच त्यांच्या होम ग्राऊंडवर अडचणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न होते. त्यावरुन नाराजीनाट्य रंगले. त्यानंतर वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहीरात आली. त्यावरुनही बरेच वाद-विवाद झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबतं झाली. ठाणे आणि कल्याणची जागा शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडे राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितले. त्यानंतर हा वाद काहीसा निवळला.
ठाण्याचा वाद निवळला तोपर्यंत आता औरंगाबादमध्ये भाजप आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी अनेकांच्या जमीनी हडपल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करुन त्याची तातडीने हकालपट्टी करावी. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असी मागणी भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे या घटना पाहिल्या तरी सरकार म्हणून कितीही आव आणला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यात मुळीच अलबेल नाही. त्यातच आता अजित पवार यांचा प्रवेश झाल्याने सत्तेचे वाटपही त्याच पद्धतीने होणार. त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, भाजप आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.