(पुणे)
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते दिलीप वळसे पाटील हे बंडखोरांच्या गटात गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ईडी, सीबीआयच्या भितीपोटी वळसे पाटील अजित दादांसोबत गेल्याची चर्चा सुरू झाली. यावर वळसे पाटील यांनी स्वत: आपली प्रतिक्रिया देत शरद पवारांची साथ सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.
मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस नाही. त्यामुळे मी शरद पवार यांची साथ सोडली नाही. माझं यामागे कोणतंही वैयक्तिक हित नाही, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवारांची साथ का सोडली? याचा खुलासा केला. वळसे पाटील मंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रथमच आज मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करताना ते म्हणाले की, डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील ६५ बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याचा धोका हेाता. यामुळे शेतीमुळे आलेली समृद्धी धोक्यात येईल. पाच साखर कारखाने धोक्यात येतील. या भागातील जनतेचा विचार करूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला. मनाला खटकत होतं. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला.
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत पक्षाची शिस्त कधीही मोडली नाही. त्यामुळे साहजिकच हा निर्णय सामुदायिकपणे घेतला गेला. यामध्ये मला सहभागी व्हावे लागले. काही लोक म्हणतील की सत्तेच्या बाहेर राहूनही झालं असतं, मात्र अशा कामांसाठी सत्तेत राहणं गरजेचं असतं. शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे मला १०० टक्के दु:ख झाले आहे. परंतु कधी-कधी असा निर्णय घेण्याची वेळ येते. आमच्या गटाचे काही प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निर्णय घेतला, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
पुढे वळसे पाटील म्हणाले की, “एका विद्वानाने सांगितलं की, पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून मी असे केले. मात्र, माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीची या डेअरीमध्ये एक रुपयाचीही गुंतवणूक नाही.”