(मुंबई)
दिवंगत सिने अभिनेते दिलीप कुमार यांनी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी संमती दिल्यानंतर खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एन .डब्ल्यू. सांबरे आणि न्यायमूर्ती एस.यू. देशमुख यांनी हा निर्णय दिला.
दिलीप कुमार यांनी वांद्रे येथील पाली हिल परिसरातील त्यांची प्रमुख मालमत्ता प्रजिता डेव्हलपर्सला विकासासाठी सोपवली होती. मात्र, विकासकांनी ठरल्याप्रमाणे विकास न केल्याने दिलीप कुमार यांनी त्यांच्याविरुद्ध २०२१ मध्ये एफआयआर दाखल केला होता
या तक्ररीनुसार, प्राजिता डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बिल्डर्स अल्ताफ व अर्शद वहेडना यांच्यावर कलम ४०३ (अप्रामाणिकपणे मालमत्तेचा गैरवापर), ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४१७ (फसवणूक), ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण करणे), १२०( ब) (गुन्हेगारी कट) आणि भारतीय दंड संहितेच्या ५०६ (गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२० एप्रिल २०१० रोजी दोन्ही पक्षांत झालेल्या कारारपत्रात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे हे आरोप करण्यात आले होते. पक्षांमधील वादांमुळे प्रकरण लवादाकडे गेले. त्यानंतर व्यावसायिक लवाद याचिका दाखल झाली होती. ती मार्च महिन्यात निकाली निघाली होती. आता बिल्डर आणि सायरा बानो यांच्यात समझोता झाला आहे. या मालमत्तेची पॉवर ऑफ अॅ़टर्नी असलेल्या सायरा बानो यांनी तक्रार मागे घेण्यास होकार दिला आहे.