(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील विलोभनीय समुद्रकिनारा गेले अनेक दिवस बिपर जॉय वादळामुळे आणि समुद्राच्या मोठ्या लाटांच्या भीतीमुळे भक्त -पर्यटकांना आंघोळीसाठी व फिरण्यास बंद करण्यात आला होता. मात्र, आज शुक्रवारी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून सकाळी समुद्रकिनारा पुन्हा एकदा सर्व पर्यटकांसाठी मोकळा करण्यात आला आहे. याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून तालुका प्रशासनाला लेखी निवेदनाने कळविण्यानंतर या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तालुका प्रशासनाने ही आपला सकारात्मक प्रतिसाद दर्शवून गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी परवानगी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत व तालुका प्रशासन यांच्या या चांगल्या निर्णायाबद्दल सर्वच लहान मोठ्या स्थानिक व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बिपरजॉय चक्रीवादळाच्या सावटात गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर अचानक सुमारे 6 ते 7 फुट उंचीची भयानक लाट आल्याने होत्याचे नव्हते झाले होते. त्यात अनेक व्यावसायिकांचे साहित्य समुद्रामध्ये वाहून गेले होते. तर अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्याने आणि पर्यटकांच्या वस्तूही वाहून गेल्याने त्या दिवसापासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पूर्णपणे पर्यटकांना अंघोळीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
समुद्रकिनारा आंघोळीसाठी बंद असल्याच्या बातम्या पसरल्यानंतर गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे अनेक ठिकाणच्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत होते. आज शुक्रवारी 23 जूनपासून पुन्हा एकदा गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांना आंघोळीसाठी व फिरण्यासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी सध्या गणपतीपुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी समुद्राला चाळ( खड्डे) पडलेले आहेत. त्यामुळे भाविक- पर्यटकांनी आंघोळ करण्यासाठी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. त्यातच गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुल्या झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यामुळे पुन्हा एकदा गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांचा ओघ सुरू होईल, अशी आशा येथील स्थानिक व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.