(जयपूर)
जयपूरमधील कौटुंबिक न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले. हुंड्यासाठी छळ केल्याच्या आऱोपाखाली कोर्टाने पतीला कारावास आणि पत्नीला ५५ हजारांची पोटगी देण्याचा आदेश दिला. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम कोर्टात जमा केली. पण ही रक्कम पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पतीने पत्नीला पोटगी म्हणून ५५ हजारांची रक्कम चक्क पोत्यांमध्ये भरुन दिली.
पतीने हे ५५ हजार रुपये नाण्यांच्या स्वरुपात आणले होते. या नाण्यांचे वजन तब्बल २८० किलो होते. म्हणून त्याने पोत्यांमध्ये भरुन पैसे आणले होते. पोत्यांमधून नाण्यांचा आवाज येत असल्याने सर्वजण आश्चर्याने पाहत होते. सर्व पोत्यांमध्ये १,२,५ आणि १० रुपयांची नाणी भरलेली होती. हे पैसे मोजण्यासाठी दहा दिवस लागतील, असे म्हणत कोर्टाने हे पैसे सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला.
जयपूरच्या फॅमिली कोर्टाची लिंक असलेल्या एडीजे कोर्टात हा प्रकार घडला. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला तुरुंगात पाठवण्याचा निर्णय दिला. तर पत्नीला तिचं जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवण्यासाठी थकीत रक्कम 55 हजार रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिले. त्यावर आरोपीच्या नातेवाइकांनी ही रक्कम जमा करून दिली.