(मुंबई)
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणे कितपत योग्य आहे, असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सोमवारी उपस्थित केला. मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केली, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या या घोषणेवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव कोस्टल रोडला व त्याच कोस्टल रोडचा भाग असलेल्या वांद्रे वर्सोवा सी-लींकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य ? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. त्यानंतर सचिन सावंत यांनी ट्विटरवर एका पुस्तकाचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचे नाव कोस्टल रोडला व त्याच कोस्टल रोडचा भाग असलेल्या वांद्रे वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य ? संभाजी महाराज नाकर्ते व रागीट होते व त्यांना मंदिरा मदिराक्षींबद्दल आसक्ती होती हे सावरकरांचे मत होते. दोन्ही नावे एकत्र हा विरोधाभास नव्हे का? असे सचिन सावंत यांनी उपस्थित केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.