चिपळूण : दादा, आता तुम्हीच आमचे वाली आहात. आम्ही व्यापारी पूर्णतः उदध्वस्त झालो आहोत. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, असा विश्वास चिपळुणातील व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी व्यक्त केला. यावेळी आपले प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असा विश्वास केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यापाऱ्यांना दिला.
चिपळुणातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी सोबत विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री व आ. गिरीश महाजन, आ. निरंजन डावखरे, उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासमवेत चिपळूण बाजारपेठेतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडल्या.
यावेळी व्यापारी म्हणाले की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पुरावेळी आठ बोटी तरंगत होत्या. हे यांचं व्यवस्थापन ! या अगोदर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा १४४ कलम लागू करून पोलीस बंदोबस्तात दुकानातील परवानगी दिली होती. मात्र, रेड अलर्टचा इशारा देऊनही येथील प्रशासनाने आम्हाला कोणतीही सूचना दिली नाही. आम्हाला जर अलर्ट केले असते तर इतके आमचे नुकसान झाले नसते. आमच्या नुकसानीला प्रशासन जबाबदार आहे. तसेच शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला सरसकट कर्ज माफी, मिळावी आणि ती तात्काळ मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी ना. नारायण राणे यांच्याकडे केले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडीज, खजिनदार उदय ओतारी, अरुण भोजने, सूर्यकांत चिपळूणकर आदी व्यापारी तसेच नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, अशिष खातू, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, शौर्य निमकर, शुभम पिसे, महेश कांबळी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.