(अयोध्या)
अयोध्येत राममंदिर आता आकार घेत असल्यानं रामभक्तांमध्येही उत्साह असून राम भक्त दूरदूरवरून अयोध्येत आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत. मंदिराच्या बांधकामासोबतच श्रीरामाची मूर्ती बनवण्याच्या कामाचाही श्री गणेशा झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथील कृष्ण श्यामल रंगीत दगडांपासून श्रीरामाची मूर्ती बनवली जाणार आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी श्याम शिला (काळा पाषाण) मध्ये भगवान श्रीरामाची मूर्ती कोरण्यात येणार आहे. ही मूर्ती म्हैसूर (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज बनवणार आहेत.
मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर 2024 मध्ये, तर 2025 पर्यंत मंदिर आकारास आलेले असेल. मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण होताच म्हणजेच डिसेंबर 2023 पासून मंदिरात दर्शन-पूजेला सुरुवात होईल. मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एकूण खर्च अंदाजे 1800 कोटी रुपयांचा होणार आहे.
ऑक्टोबरपर्यंत तयार होणार पहिला मजला
सध्या राम मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे, त्यानंतर आता गर्भगृहाचा आकारही दिसू लागला आहे. गर्भगृहासाठी बनवलेल्या खांबांचे काम पूर्ण झाले असून आता छताचे मोल्डिंगचे काम सुरू झाले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गर्भगृह पूर्ण करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराचा पहिला मजला तयार होईल. पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल, तर दुसरा मजला रिकामा राहील. मंदिराची उंची वाढवण्याची तयारी केली जाणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम प्रगतिपथावर असून हे मंदिर वर्षाअखेरीस किंवा जानेवारी २०२४ मध्ये भाविकांसाठी खुले होईल, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिर बांधकामाचा पहिला टप्पा २० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे काम ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पूजाअर्चा सुरू होईल, असा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात तळमजल्यावर पाच मंडप आहेत, यातील गर्भगृहात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. गुरू मंडप, प्रार्थना मंडप, नृत्य मंडप असे इतर मंडप आहेत. या पाचही मंडपांमध्ये १६० स्तंभ आहेत. ते नक्षीकामाने सजवलेले आहे. तसेच खालच्या मजल्यावरील स्तंभांमध्ये श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग दाखवले जाणार आहेत.