सौ.प्राजक्ता परेश सरदेसाई दामले
परदेशात जायची संधी चालून आली आहे हे कळल्यापासून तुषार खूपच खुश होता. इतके दिवस त्याने उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होणार होते. त्यासाठी त्याने अहोरात्र मेहनत घेतली होती. जी संधी फार कमी जणांना मिळते अशी अमेरिकेत जाण्याची संधी कंपनी त्याला देणार होती. बऱ्याच उमेदवारातून कंपनीने त्याची निवड केली होती. याचा मनस्वी आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. घरी जाऊन ही बातमी आपल्या आई, वडिलांना द्यावी असे त्याला मनोमन वाटले. आजच्या दिवसाचे काम संपवून तो घरी निघाला. तुषारने स्वतःची गाडी चालू केली आणि गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी चालवत असताना असंख्य विचार त्याच्या मनात होते. आई, बाबांची यावर काय प्रतिक्रिया असेल, मी अमेरिकेत गेल्यावर तिकडे काय असेल, तिथे सगळे माझ्यासाठी नवीन असेल. तुषारचे विचारचक्र चालू होते. सिग्नल लागल्याने त्याला थांबावे लागले. त्याचे लक्ष बाजूला असलेल्या हॉटेलकडे गेले. त्याच्या लक्षात आले, अरे या हॉटेलमधील दहीवडा बाबांना खूप आवडतो पण अलीकडे खूप दिवसात खाल्ला नाहीये बाबांनी दहिवडा. कधीतरी मीच न्यायला हवा होता दहीवडा पण राहूनच गेलं. असा विचार तुषारच्या मनात आला. आज मात्र नक्की घेतो दहीवडा बाबांसाठी. तो गाडीतून उतरला आणि हॉटेलमध्ये जाऊन दहीवड्याचे पार्सल घेऊन आला आणि निघाला.
तुषार घरी पोहोचला. आई समोरच होती. ‘आलास रे, एवढेच आईने विचारले. तो हो एवढंच बोलला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. बाबा जवळच्याच बागेत फिरण्यासाठी गेले होते. फ्रेश होऊन तुषार आईसमोर येऊन बसला. ‘चहा करते हा’ असे तुषारची आई म्हणाली आणि चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली.बाबा आल्यावर दोघांशी एकदम या विषयावर बोलूया असे तुषारने ठरवले. ‘तुषार, ये चहा घ्यायला. आईने स्वयंपाकघरातून हाक मारली. तो उठला. स्वयंपाकघरात गेला. तुषार तुझी नोकरी आत्ता कायमस्वरूपी झाली आहे, आता लग्नाचं घे मनावर’ आई त्याला म्हणाली .’काय आई तू पण आता टीपिकल आई सारखी बोलायला लागलीस तुषरने लगेच प्रत्युत्तर दिले., अरे माझ्याकडे स्थळ आलेत. बघ तरी ती. तुला पसंत असल्याशिवाय आमची काही जबरदस्ती नाही. आई समजुतीच्या स्वरात म्हणाली. आई मला चहा तरी घेऊ देशील की नाही ‘तुषार म्हणाला. ‘बर बाबा नाही बोलत’ आई म्हणाली. बागेतून फिरून येऊन बाबा आता सोफ्यावर येऊन बसले होते. ‘तुषार आला का ‘बाबांनी विचारले. ‘हो बाबा ‘तुषार म्हणाला. आई, आणि तुषार आता बाहेरच्या खोलीत आले. चहा घेऊन झाल्यावर ‘बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं ‘तुषार म्हणाला. ‘अरे बोल ना’ बाबा म्हणाले. ‘बाबा, मला अमेरिकेत जायची संधी मिळतेय माझ्या कंपनीकडून आणि मी ती स्वीकारायची ठरवलेय’. ‘तुझा निर्णय तू घेतलाय मग आम्ही काय बोलणार” थोड्याशा रागानेच बाबा म्हणाले. ‘तस नाही बाबा त्याच्या आवाजात एकदम भावुकपणा आला. ‘भारतात राहून एवढा पगार मला कधीच मिळणार नाही” तुषारने पुस्ती जोडली. “म्हणजे केवळ पैशासाठी तू हा निर्णय घेतला आहेस” बाबा अजूनही रागातच होते. “पैसा महत्त्वाचा असतोच ना आयुष्यात, हेच वय आहे पैसे मिळवण्याचं” तुषार म्हणाला. ‘जगण्यासाठी पैसा लागतो पण माणूस पैशासाठी नसतो” बाबा म्हणाले. आई त्या दोघांचे बोलणे ऐकत होती. तुषार आता इथे बसणार या भावनेने ती खंतावली पण काहीच बोलली नाही.
” अरे भारतात राहूनही तुला तुझ्या क्षेत्रात पुढे जाता येईल.” बाबा म्हणाले. “हो पण एवढा पगार नाही मिळणार” तुषार म्हणाला. “आता तू ठरवलच आहेस मग आम्ही काय बोलणार” बाबा म्हणाले .”तुमच्याजवळ मी एक केअर टेकर ठेवतो ना” तुषार म्हणाला .”केअर टेकर त्याची काही गरज नाही” बाबा काहीशा रागातच म्हणाले. चर्चेचं रूपांतर आता वादात होत होत. “शांत व्हा आता दोघंही आणि जेवायला चला” आई म्हणाली.
तुषारच्या लक्षात आले आपण बाबांसाठी दहीवडा आणला आहे पण बाबांना आत्ता राग आलाय म्हणून आत्ता नको द्यायला दहीवडा म्हणून त्याने आणलेले पार्सल तसेच फ्रिजमध्ये ठेवून दिले. केवळ पद्धत म्हणून तिघेही जेवायला बसले आणि फारस काही न जेवता उठले. जेवण झाल्यावर तुषार लगेच त्याच्या खोलीत निघून गेला. आई बाबा खालच्या मजल्यावर होते. “मला शाळेत सोडायला तूच चल असा हट्ट करणारा माझा मुलगा आज देश सोडून जायचं असे म्हणतोय” आई म्हणाली .”मोठा झालाय आता तो.स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. पैशाची हाव निर्माण झालीय त्याच्यामध्ये” बाबा म्हणाले. तुषार स्वतःच्या खोलीत होता. त्याने स्वतःचा मोबाईल पहिला व्हॉट्सॲपवर भरपूर मेसेज आले होते. पण ते पाहण्यातही त्याचे मन लागेना. तो अंथरुणावर आडवा झाला. पण मनातील विचार पाठ सोडत नव्हते. एकीकडे गलेलठ्ठ पगार दिसत होता आणि दुसरीकडे बाबांचे बोलणे आठवत होते. काय करावे या कात्रीत तो सापडला होता.
खालच्या मजल्यावर असणारे आई ,बाबाही अस्वस्थ होते. रात्रभर कोणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही.
सकाळ झाली. आई, बाबा नेहमीप्रमाणेच लवकर उठले .तुषार ही आता उठला. आपल्या खोलीबाहेर आला. आईने चहा केलाच असणार हा विश्वास होताच मनात. बाबा झाडांना पाणी घालत होते “बाबा” त्याने हाक मारली. परंतु आपल्या हाकेला बाबा काही प्रतिसाद देत नाहीत हे पाहून तुषार स्वतः बाबांसमोर गेला. “बाबा, घरात चला” तो म्हणाला. झाडांना पाणी घालण्याचे काम झाल्याने बाबाही घरात आले.
“बाबा, मी निर्णय घेतलाय” तुषार म्हणाला. “तो तर तू कालच घेतलाय” बाबा म्हणाले”. तुषारने मोबाईल फोन घेतला आणि बाबांसमोर आपल्या वरिष्ठांना फोन लावला. आणि तुषार म्हणाला “नमस्कार सर, परदेशात जाण्याची संधी मी स्व:खुशीने नाकारतो आहे. मला भारतात राहूनच माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. माझ्या देशात मिळणाऱ्या आनंदाला मला मुकायचे नाही. तुम्ही परदेशात जाण्याची संधी दुसऱ्या कोणालाही देऊ शकता. धन्यवाद सर .”समोरून काही उत्तर यायच्या आत त्याने फोन ठेवला देखील. तुषारने आई, बाबांकडे पाहिले त्या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान होत, आनंद होता, कौतुक होत. तुषारने फ्रिज उघडला. बाबांच्या आवडीचा दहीवडा बाहेर काढला. ‘बाबा, तुम्हाला आवडतो म्हणून मी दहीवडा आणला आहे. खूप दिवसात खाल्ला नाही ना तुम्ही. कालच आणला. काल नाही दिला. घ्या ना बाबा” तुषार म्हणाला. तुषारच्या निर्णयाने आणि बाबांबद्दल दाखवलेल्या प्रेमाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
माझ्या घराला कोणाचीही दृष्ट नको लागायला असे आईने आपल्या मनात म्हंटले.
तुषारने दहीवड्याचा पहिला घास बाबांना भरवला. कालचा असला तरीही दहीवडा बाबांना गोड लागला, अगदी खूप खूप गोड!