(मुंबई)
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेची एसआयटी चौकशी करण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही एसआयटी यावर्षीच्या घटनेसह गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे. राज्यात सर्व जातीपातीची लोक राहतात. कोठेही जातीय तणाव निर्माण होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही यासाठी सगळ्या समाजातील लोकांनी काळजी घ्यावी.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेया संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहोत… तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी मंदिराच्य रक्षकांसह ५ ते ७ जणांची चौकशी केली जात आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी माहिती समोर येईल. आरोपींचा असे कृत्य करण्यामागे काय उद्देश होता, हे तपासानंतरच कळेल.
– बी. जी. शेखर पाटील,(विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक)