(लखनौ)
मुंबईच्या संघाने जिंकत आलेला सामना गमावला आहे. मुंबईने झोकात सुरुवात केली आणि त्यांनी ९० धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर इशान आणि सूर्यकुमारही लवकर तंबूत परतले. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली आणि तिथेच हा सामना मुंबईच्या हातून निसटला. लखनौच्या संघाने मुंबईपुढे विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबईच्या संघाला १७२ धावा करता आल्या आणि त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
मार्कस स्टॉयनिसची फटकेबाजी आणि त्यानंतर मोहसीन खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौच्या संघाने मुंबईला ७ धावांनी पराभवाची धुळ चारली. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने लखनौला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. मार्कस स्टॉयनिसच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने मुंबई समोर २० षटकात १७८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, काही षटकानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. मुंबईच्या संघाला २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.
लखनौच्या १७८ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा लवकर बाद होत होता. पण यावेळी रोहित खेळपट्टीवर टिकून राहिला. रोहितला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याच्या खेळीने मुंबईच्या संघाला चांगली सलामी मिळाली. रोहितने यावेळी २५ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईच्या संघाला १० षटकांत ९० धावांची सलामी देता आली. इशानने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही.
इशानने ३९ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही ७ धावांवर बाद झाला आणि त्यामुळे सामना अधिक रंगतदार झाला. त्यानंतर डेव्हीड आणि ग्रीन सामना जिंकून देतील, असे वाटत असताना शेवटच्या क्षणी लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्यामुळे विजय टप्प्यात असताना मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबईने लखनौच्या संघाला सुरुवातीलाच धक्के दिले होते. मुंबईचा वेगवान गोलंदाज जेसन बर्डनहॉफने सलग दोन चेंडूंमध्ये लखनौच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जेसनने तिस-या षटकातच सलामीवीर दीपक हुडाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतरच्या चेंडूवर जेसनने गेल्या सामन्यात मॅचविनर ठरलेल्या प्रेरक मांडकला शून्यावर बाद केले. जेसनने एकामागून एक दोन धक्के दिल्यावर लखनौचे कंबरडे चांगलेच मोडले. जेसन या आयपीएलमध्ये सातत्याने अचूक आणि वेगवान गोलंदाजी करत आहे.
मुंबई इंडियन्सने लखनौची या सामन्यात जेसनमुळे २ बाद १२ अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर पीयुष चावलाने अजून एक धक्का लखनौला दिला. पण त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि कर्णधार कृणाल पांड्या यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी मिळून लखनौच्या संघाचा डाव सावरला. कारण या दोघांनी महत्वाच्या क्षणी अर्धशतक भागीदारी रचली. पण ४९ धावांवर असताना कृणाल जखमी झाला. त्याची दुखापत गंभीर होती. त्यामुळे त्याला ४९ धावांवर जखमी निवृत्ती व्हावे लागले. पण कृणाल मैदानाबाहेर गेला असला तरी मार्कसने मात्र धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळेच लखनौच्या संघाला १७७ धावांचा डोंगर उभारता आला.