(नागपूर)
महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा रविवारी नागपूरमध्ये पार पडली. या सभेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.
कारगिल युद्धात भारतीय जवानांनी विजय मिळवल्यानंतर भाजपने लष्कर प्रमुखांचे, जवानांचे फोटो वापरून पक्षाचा प्रचार केला होता. याबद्दलची तक्रार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याची दखल घेत तशाप्रकारचे बॅनर हटवले. आताचे पंतप्रधान असते तर त्यांनी लष्करप्रमुखांनाच तुरुंगात डांबले असते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव म्हणाले की, आनंदाचा शिधा वेळेवर पोहचला नाही. त्याला बुरशी लागत असल्याचे आढळून आले आहे. आता राज्याच्या कारभारालाच बुरशी लागली असून त्यातून शिधा तरी कसा सुटणार,असा बोचरा सवालही त्यांनी केला.
राज्यात अवकाळीने कहर केला असून गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूअसताना मुख्यमंत्री देवदर्शन करत आहेत. हे जर रामभक्त असते तर सूरतला, गुवाहाटीला पळाले नसते. हे सगळेजण अयोध्येला गेले असते, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
- आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो पण, देशातील लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठीच होत आहे. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे.
- आमचं सरकार यांनी गद्दारी करुन पाडलं. यांनी आमच्या पाठीत वार केला. महाराष्ट्र शूरांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर आणि वार करू तर छातीवरच करू. ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे.
- आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे गेले. तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच यांचा दौरा होता.
- घरात बसून कारभार करत असूनही लोकांच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं? एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात नागपूरला आणणार होते पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करतात.
- काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत? आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभेनंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती?
- आम्ही सातत्याने राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. राम मंदिराच्या कायद्याबाबत शांत बसले होते. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी टिकोजीराव फणा काढून बसले.
- रोशनी शिंदेवर हल्ला केला… उपचार घेत असताना तिला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. गृहमंत्र्यांना फडतूस नाही तर आणखी काय शब्द वापरावा?
- ही काय लोकशाहीची दहिहंडी आहे का…दिसली हंडी की फोड…विरोधकांची सत्ता पाडायची कामे सुरू आहेत.