(गुहागर / उमेश शिंदे)
तालुक्यातील आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. नॅशनल ग्रासरूट इनोव्हेशन अवॉर्ड २०२३ (राष्ट्रीय पातळीवरिल ग्रामीण भागात संशोधन पुरस्कार २०२३) हा पुरस्कार कारेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करताना SK-4 (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. नवोपक्रम आणि उद्योजकतेचा उत्सव या उपक्रमांतर्गत सचिन कारेकर यांच्या कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
सचिन कारेकर यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांनी हळद लागवडीचं तंत्रज्ञान विकसित तर केलंच पण रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः कोकणातील हवामानात अधिक उत्पादन देणारी व किड रोगास सहसा बळी न पडणारी हळदीची SK-4 (स्पेशल कोकण -4) ही जात विकसीत केली आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन गेल्यावर्षी त्यांना केंद्र शासनाजवळ संबंधित असलेल्या नॅशनल इन्नोव्हेशन फाऊंडेशन, इंडिया (गुजरात) च्या वरीष्ठ प्रकल्प सहकारी विपिन रातुरी यांनी कारेकर यांच्या हळद लागवडीच्या प्रक्षेत्राला भेट देवून त्यांचे कौतुक केले होते. या संस्थेकडून केंद्र शासनाकडे कारेकर यांचे काम पाहून शिफारस करण्यात आली होती.