( अहमदाबाद )
कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून पराभव केला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकून सामना जिंकवला. रिंकून एकूण सहा षटकार ठोकले. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय आहे. गुजरातने दिलेले २०५ धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार राशिद खान याने हॅट्ट्रिक घेतली.
Watching this on L➅➅➅➅➅P… and we still can't believe what we just witnessed! 🤯pic.twitter.com/1tyryjm47W
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 9, 2023
शेवटच्या षटकात या केकेआर संघाला विजयासाठी २९ धावांची गरज होती आणि रिंकू सिंगने सलग पाच षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने २१ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली.
२०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज गुरबाज आणि नारायण जगदिशन झटपट बाद झाले. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. नीतीश राणाने ४५ धावांची झटपट खेळी केली. या खेळीत राणाने ३ षटकार आणि चार चौकार लगावले तर वेंकटेश अय्यर याने ८३ धावांची खेळी केली. या खेळीत वेंकटेश अय्यर याने ५ षटकार आणि ८ चौकार लगावले. वेंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोसळला. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. राशिद खान याने हॅट्ट्रिक घेत गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या. आंद्रे रसेल, नारायण आणि शार्दूल ठाकूर यांना राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला.
हा सामना कोलकात्याच्या हातून गेला असेच वाटत होते. पण अखेरच्या षटकात रिंकू सिंह याने करिश्माई फलंदाजी केली. यश दयाल याच्या अखेरच्या पाच चेंडूवर रिंकू सिंह याने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. दरम्यान, प्रथम फंलदाजी करताना साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित २० षटकात चार विकेटच्या मोबदल्यात २०४ धावांपर्यंत मजल मारली.
१९ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात १७६ अशी होती. रिंकू सिंग १६ चेंडूत १८ तर उमेश यादवने ५ चेंडूत ४ धावांवर खेळत होता. अशा स्थितीत गुजरातचा विजय निश्चित वाटत होता, मात्र उमेश यादवने यश दयालच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर रिंकू सिंगने उरलेल्या ५ चेंडूत ५ षटकार ठोकले. अशा प्रकारे गुजराने जिंकलेला सामना गमावला आणि कोलकाताना थरारक विजय मिळवला.