[ संगमेश्वर/ प्रतिनिधी ]
शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी अंतर्गत उपकेंद्र तेरे, कोसुब, धामणी येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त “सुंदर माझा दवाखाना” या संकल्पनेतून केंद्रांची अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच रॅली देखील काढण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वच्छ व लोकाभिमुख करण्यासाठी ७ ते १४ एप्रिलदरम्यान ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे.
जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी रॅली काढली. रॅलीत आशा, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते. ‘समान आरोग्य सेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. या कार्यक्रमाला डॉ. रायभोळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका आरोग्य सहाय्यक श्री. सूर्यवंशी यांच्या सह, आरोग्य सहाय्यक सौ. नाईक मॅडम, आरोग्य साहाय्यक श्रीमती वर्षा कदम , श्री. शिंदे, श्री. गुरव, सौ. देवस्थळी,सौ. दीपिका जाधव सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.