(चिपळूण)
चिपळूण येथील २५ वर्षीय हिंदू महिलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिचा पती व सासरच्यांकडून छळ करण्यात आला. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलिसांनी तिचा पती, सासू, नणंद यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान आपल्या मुलांना सासरी धोका असल्याचे सांगत महिलेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे दाद मागितली आहे.
पती मसुद रज्जाक शहा, सासू नसिमा रज्जाक शहा, कनिज रज्जाक शहा, निकत काजिम शहा व फौजिया नदिम शहा (रा. सर्व चिपळूण) अशी गुन्हा करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मसुद शहा याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये पीडित महिला व मसुद शहा यांची भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यावेळी मसुद याने पीडित महिलेजवळ लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पीडित महिलेने लग्न करण्यास नकार देत आपण धर्म बदलणार नसल्याचे सांगितले. मात्र लग्न झाल्यानंतर धर्म बदलण्याची गरज नसून हिंदू धर्म पाळण्यास तिला संमती दिली. दरम्यान पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आणि सासरचे लोक गेल्या ३ वर्षांपासून धर्म बदलण्यासाठी तिचा छळ करत असून कुटुंबाकडे पैशांची मागणी करतात. तिच्या आईच्या कुटुंबाकडून सुमारे १४ लाख रुपये काढून घेतले. तसेच जातीवाचक शिवीगाळ व शारिरीक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी’ दिली, अशी तक्रार पीडित महिलेने चिपळूण पोलिसांत दाखल केली.
दरम्यान पीडित महिलेने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला पत्र लिहिले असून त्यामध्ये ‘माझ्या पतीनेही मला धर्म परिवर्तन करण्यास सांगितले. माझ्या जातीवरून मला छळले गेले. पैशासाठी त्यांनी माझ्या कुटुंबियांनाही लुबाडले. मी आता सासरचे घर सोडून चिपळूणला माझ्या आजोबांच्या घरी आली आहे. पण माझी दोन्ही मुलं माझ्या सासरच्या कैदेत आहेत आणि मला त्यांची काळजी वाटते, असे या पत्रात महिलेने म्हटले आहे.