(चिपळूण)
घराच्या मालकीच्या हक्कातून वृध्द महिलेवर हल्ला करणाऱ्या तिघांचा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
चिपळूण तालुक्यातील मालघर येथील सुलोचना दत्ताराम वाजे या वृद्धेवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना चिपळूण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने २४ मार्च रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मालघर येथील सुलोचना दत्ताराम वाजे आणि तिचे पती दत्ताराम वाजे, तसेच मुलगा अजय वाजे, सून अनघा वाजे यांच्यामध्ये घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होते. हा वाद २१ मार्च रोजी विकोपाला गेला आणि पती दत्ताराम यांच्याबरोबर मुलगा व सुनेने सुलोचना यांच्यावर कोयत्याने हल्ला करत वार केले होते. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संशयितांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन.एस. मोमीन यांच्यासमोर सुनावणी घेतली. यावेळी संशयितांच्या वतीने ॲड. फारुक म्हातारनाईक व ॲड . संदेश भोसले यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य मानत न्यायालयाने तिघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला, तसेच प्रत्येक सोमवारी पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.