(मुंबई)
देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. या दोन्ही शहरादरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सध्या मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग अन रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. नुकतीच मध्य रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा देखील या प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत असल्याने यामुळे मुंबई ते पुणे चा प्रवास सोयीचा झाला आहे.
वास्तविक, पुणे ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरात दरम्यान थेट विमान सेवा सुरू केली जावी अशी प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. एअर इंडिया च्या माध्यमातून 26 मार्चपासून या दोन्ही शहरांदरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे. ही दोन्ही शहरे केवळ राज्याच्या दृष्टीनेच नाही तर देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.
त्यामुळे आता या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी लागणारा तीन तासांचा कालावधी मात्र एक तासावर येणार आहे. वास्तविक या दोन्ही शहरांदरम्यान थेट विमानसेवा याआधी होती मात्र 2019 मध्ये ही विमान सेवा बंद करण्यात आली. पण आता 26 मार्चपासून पुन्हा एकदा या मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे.
असे राहणार वेळापत्रक
या मार्गावरील विमानसेवा आठवड्याचे सहा दिवस चालू राहणार आहे. शनिवारी मात्र या रूटवर विमान सेवा बंद असेल. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावरून सकाळी 11.20 वाजता निघून मुंबईत 12.20 वाजता पोहोचणार आहे. दरम्यान 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या या विमानसेवेसाठी बुकिंग आतापासूनच सुरू झाले आहे. निश्चितच एअर इंडियाचा हा निर्णय पुणे आणि मुंबईकरांना दिलासा देणारा राहणार आहे.
किती राहणार तिकीट
मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई दरम्यान विमानाने प्रवास करण्यासाठी इकॉनॉमिक क्लासचे तिकीट दर 2237 रुपये राहणार आहेत. तर बिझनेस क्लास मधला तिकीट दर 18 हजार 467 रुपये इतका राहणार आहे.