(मुंबई)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फलकाला विधीमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आमदारांनी जोडो मारो आंदोलन केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तर या वादावर विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर देशातील जनता आणि आम्ही तो सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले आहे. त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.