दापोली तालुक्यातील गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा जनहिताचा उपक्रम हा कोरोना संसर्ग साथीच्या काळातील अतिशय गरजेचा असा उपक्रम असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना दिली. त्याचाच भाग म्हणून ऑक्सीजन कॉन्संट्रेटरच्या दोन मशीन आपण आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तर वॉटर हिटर तिथल्या तीथेच गिम्हवणे कोव्हिड सेंटरला उपलब्ध करून दिले.
दापोली विधानसभा मतदार संघात नागरिकांच्या कोरोना उपचाराच्या सोयीसाठी आपण आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी कोव्हीड साठी दिला आहे. त्यातील 50 लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आपण मतदार संघासाठी हाँगकाँग वरून मागवल्याचे त्यांनी सांगितले.तर सरपंच साक्षी गिम्हवणेकर या बोलताना म्हणाल्या की, ग्रामस्थांच्या सहकार्याने व ग्रामपंचायत पुढाकाराने हे कोव्हीड सेंटर उभे राहिले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणून ते लवकर बंद होईल अशी आमची ईच्छा व प्रयत्न असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या शैलीत भैरी भवानी देवस्थानचे अध्यक्ष शंकर साळवी यांनी केले. हे कोव्हीड सेंटर 30 बेडचे असून ज्यांनी ज्यांनी यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.