(रत्नागिरी)
‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेल. ग्रामीण भागाची जीवनदायिनी म्हणून ‘लालपरी’ची ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यात आज लालपरीला खूप महत्व आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे. नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या घोषणेमुळे सध्या एसटी कर्मचारी मात्र त्रस्त असून अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसोबत वादावादी सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. एसटी महिला प्रवाशांना जाहीर झालेल्या तिकिट दराच्या सवलतीवरून एसटी वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये नियमित वाद होत आहेत. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अद्याप जीआर नाही
एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. एसटीमधून प्रवास करणार्या ग्रामीण भागातील महिला वा नातेवाईक प्रवाशांकडून सवलत लागू करत नसल्याने एसटी वाहकांना मारहाणही केली जात आहे. त्यामुळे जीआर न काढल्यामुळे एसटी कर्मचार्यांना ग्रामीण भागांमधे ड्यूटी करणे जिकीरीचे झाले असल्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.