(मुंबई)
राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
कर्मचारी संघटनांच्या प्रमुखांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळं कर्मचारी संघटनांनी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळं राज्यातील तब्बल १९ लाख कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळं त्याचा सामान्यांना मोठा फटका बसणार आहे.
जुन्या पेन्शन योजनेबाबतत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारनं एका समितीची घोषणा केली आहे. परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्यामुळं कर्मचारी संघटनांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
यावेळी बैठकीत राज्य सरकारच्या वतीनं संप मागे घेण्याच आवाहन करण्यात आलं. परंतु त्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. मध्यरात्री बारापासून म्हणजेच उद्यापासून कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळं राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.