(संगमेश्वर / प्रतिनिधी)
प्रथमच देशपातळीवर विद्युत क्षेत्रात महत्वपूर्ण काम करणार्या लाईनमनचा त्याच्या वीज ग्राहकांना सेवा देण्याप्रती तसेच त्यांच्या खडतर जिवन प्रवासाला उचित न्याय देण्याच्या हेतूने ४ मार्च राष्ट्रिय लाईनमन दिन घोषित केला आणि ४ मार्च २०२३ पासून संपूर्ण देशभर लागू केला.याची दखल प्रशासना बरोबरच महावितरण कंपनीतील तांत्रिक कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी अग्रेसरपणे लढणार्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने घेवून संपुर्ण कोकण झोन मधिल प्रत्येक शाखा कार्यालया पर्यंत पोहचून तांत्रिक कर्मचार्यांच्या सत्काराच्या माध्यमाने लाईनमनचा गुणगाैरव करुन मिठाई वाटून अत्यंत आनंदोत्सवाने साजरा केला.
फयान ,तोक्ते सारखी वादळे, महापूर किंवा कोरोना महामारी असो अशा खडतर परिस्थितीत लाईनमन ने आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून वीज ग्राहकांना दिलेली अतुलनिय सेवेची दखल शासनाला घ्यावी लागली. असे गाैरवोदगार कोकण झोन सचिव महेंद्र पारकर यांनी या प्रसंगी काढले.
कुठलाही व्यवसाय उद्योग यासाठी वीज हा मुख्य घटक आहे वीजनिर्मिती, वहन व वितरण ही खूप महत्त्वाच, जबाबदारीची व थोडी क्लिष्ट अशी व्यवस्था आहे जी कुशल लाइनमन तंत्रज्ञ यांच्याशिवाय चालणे केवळ अशक्य आहे. वीज निर्मिती केंद्राची उभारणी, पारेषण कंपनीचे मनोरे आणि वितरण कंपनीच्या पोल व उपकेंद्र उभारणी पर्यन्त ते आपल्या पर्यन्त वीज पोचणेसाठी प्रत्येक ठिकाणी लाइनमनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
आपण जेव्हा कडक उन्हाळ्यात, कडाक्याच्या थंडीत,आणि मुसळधार पावसामध्ये घरात सुरक्षित असतो तेंव्हा वीज गेल्यावर लाइनमनच तिन्ही ऋतूत रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून फिरून वीज पुरवठा लवकर चालू करण्यासाठी जीवाची बाजी लावून अनेक धोके पत्करून अंधारात काम करत असतो.आपल्याला वीज गेल्यावर अंधारात आपल्या नेहमीच्या राहत्या घरात फिरता येत नाही. विचार करा की,लाइनमन अंधारात एकट्याने कस काम करत असेल आणि किती धोके पत्करत असेल त्यामुळे वीज गेल्यावर थोडा संयम ठेवून लाइनमनला दोष देऊ नका.उलट आपण त्याचे आभार मानायला हवेत की तो अंधारात फिरतो म्हणून आपल्या घरात वीज चालू होते त्याला हौस नसते कुणालाही अंधारात ठेवायची,कारण ग्राहकाला अंधारात ठेवून त्याचा वैयक्तिक काहीही फायदा नसतो उलट ग्राहकांचा वीज पुरवठा बंद राहील्याने ग्राहकांचे नुकसान तर आहेच पण कंपनीचेही महसुली उत्पन्न बुडणार असते याची त्याला जाणीव असते.
कोरोना महामारीच्या काळात जेंव्हा जवळ जवळ संपूर्ण जग थांबलं होत त्या वेळी अत्यावश्यक सेवेतील लाइनमनच कर्तव्य म्हणून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात टाकून कामावर होता त्यामुळेच आपल्या सर्वांचे घरी राहणे सुसह्य झाले व बरेचजण घरी राहूनही काम करू शकले.विचार करा जर वीजव्यवस्थेतील हा *मुख्य घटक* हा लाइनमनच महामारीच्या काळात भीतीने कामावर आला नसता तर अनेक सरकारी यंत्रणा चालू शकल्या नसत्या त्या काळातील लाइनमनचे योगदान खूप मोठे आहे हे विसरून चालणार नाही. केवळ महामारीच नाही तर कोकणामध्ये आलेल्या *फयान, निसर्ग व तौक्ते वादळ ,चिपळूणचा महापूर तसेच देशभरात अश्या आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये लाइनमनने झोकून काम केले म्हणूनच कोलमडून पडलेली वीज यंत्रणा लवकर पूर्ववत होऊ शकली.
वितरण कंपनीचा विचार केला तर आज केवळ ITI इलेक्ट्रिशियन/वायरमन एवढेच तांत्रिक शिक्षण असूनही लाइनमन अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहे .ग्राहकांच्या कंपनीकडून अपेक्षा वाढल्या आहेत तर प्रशासनाला लाइनमनकडून कामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.परंतु लाइनमन हा माणूस आहे त्यालाही काही मर्यादा आहेत हे कंपनी विसरते अस वाटत. कंपनी पगार ८ तासांचा देते पण कामाची अपेक्षा मात्र २४ तासात केव्हाही करण्याची करते हे कुठेतरी अन्याय कारक वाटते.
दैनंदिन कामाबरोबरच सध्या वीजबिलवसुली हा मोठा गंभीर प्रश्न कंपनी समोर आहे.त्यासाठीची जबाबदारीही कंपनी लाइनमनवरच टाकते. ज्याचाशी त्याचा तसा थेट संबंध काही नाही,कारण त्याची नेमणुकच मुळात तांत्रिक कामासाठी झाली आहे वसुलीसाठी नाही. तरीही केवळ कंपनीमहसूल वाढीसाठी(वेळ प्रसंगी ग्राहकांचा रोष पत्करून) तेही काम लाइनमन करून कंपनीच्या महसुलात भर घालत आहे.
काही वेळा विशेष करून कोकणासारख्या दुर्गम ग्रामीण भागात अत्यावश्यक वेळी अपुऱ्या मनुष्यबळा अभावी वीज पुरवठा पूर्ववत करणेसाठी क्वचित प्रसंगी नाईलाजास्तव ग्राहकांची मदत घ्यावी लागते ,पण वीज बिल वसुलीचे वेळी त्याच ग्राहकाचे नाव जर यादीत आले तर त्याचा वीज पुरवठा कर्तव्य म्हणूनही त्याला खंडित करावा लागतो अशा वेळी लाइनमनची द्विधा मनस्थिती असते. मात्र हे करताना लाइनची देखभाल व दुरुस्ती, ट्री कटिंग , ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स यासाठी त्याला पुरेसा वेळ इच्छा असूनही देता येत नाही. मग सुरू होते ते कधीही न संपणारे ब्रेकडावूनचे दुष्टचक्र. ज्यातून त्याची कधीच सुटका होत नाही.त्यामुळे महावितरणमधील लाइनमनची या अतांत्रिक कामातुन ज्या दिवशी सुटका होईल व त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ लाइनसाठी, विविध देखभाल व दुरुस्तीसाठी देता येईल आणि पूर्ण फोकस फक्त तांत्रिक कामावर करता येऊन ब्रेकडावूनची वारंवारता कमी होईल. या लाईनमन दिनाच्या निमित्ताने लाईनमन अशी अपेक्षा करतात की, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जो रोष व्यक्त केला जातो तत्पुर्वी त्या घटनेच्या वेळीचे कारण प्रथम समजून घ्या म्हणजे लाईनमन समजणे सोपे जाईल. असा विद्युत क्षेत्रातला लाईनमन आपल्याला पाहता येईल मात्र जाणता आला तर त्याच्या प्रती तुम्ही आम्ही ठेवलेल्या आदरप्रती कंपनीच्या माध्यमातून आणखी अधिक प्रभावीपणे वीज ग्राहक सेवा घडून येईल.
असा ऐतिहासिक ४ मार्च राष्ट्रिय लाईनमन दिवस कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रादेशिक कार्यकारणी सदस्य श्री. संजय भोसले, अध्यक्ष किशोर साळुंखे तसेच संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार कदम,बिपिन कोल्हापुरे, संदीप नेवरेकर, सतीश भोसले, निलेश खेतले, राजकुमार पवार,राजेश शिंदे, मयुर पंडित, संतोष रसाळ, दिपक गोरे, मनिष चोचे, दिपक फेफडे, मंगेश कांगणे, मंगेश जाधव, संकेत दाभाडे, शाम लवंदे, विरेंद्र जाधव, प्रदीप वाडेकर, संदिप कडवेकर, प्रशांत फुटक, अभिजित मांडवकर, कमलाकर गुरव, रुपेश केतकर, प्रितम करंगुटकर,अमोल साळवी, मनोज मयेकर, संदिप रसाळ, यशपाल कदम तसेच सिंधुदुर्ग मध्ये सतीश नाईक विजय सावंत, उदय परब, मकरंद कोचरेकर, विजय आग्रे, नितीन मारगुडे किरण नाईक, मोहन चव्हाण, अविनाश तावडे यांनी विशेष मेहनत घेतली या सर्वांचे सर्कल सचिव मा. महेंद्र शिवलकर यांनी सस्नेहपूर्वक आभार मानले.