(नवी दिल्ली)
महागाईने अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्य, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलापासून सर्वच वस्तूंचे दर वाढलेले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरच्या दरवाढीचाही सपाटा सुरू आहे. १ मार्च रोजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरचा दर ११०० रुपयांवर गेला. तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५६ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ अधिक सोसावी लागत आहे.
गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे होळीपूर्वीच जनतेला महागाईच्या तडाख्याला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या वाढीबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अलीकडेच १४.२ किलोच्या घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरची किंमत ११०३ रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, गेल्या ४ वर्षांत सिलिंडरच्या किमतीत सुमारे ५६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील एलपीजीसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंधित उत्पादनांच्या किमतींशी जोडल्या जातात. सौदी सीपीच्या सरासरी किमती, ज्यावर घरगुती एलपीजी किमती आधारित आहेत. २०१९-२० ते २०२१-२२ दरम्यान ४५४ अमेरिकन डॉलर्सवरून ६९३ अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. २०२२-२३ मधील सरासरी सौदी सीपी फेब्रुवारी २०२३ पर्यंत ७१० डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
दरम्यान, गरीब घरातील महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत ८ कोटी कनेक्शन देण्यात आले. उज्ज्वला २.० अंतर्गत सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना मोफत एलपीजी कनेक्शन व्यतिरिक्त पहिल्यांदा गॅस शेगडी देण्यात आली. उज्ज्वला २.० अंतर्गत १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १.६ कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.
२०१९ मध्ये सिलिंडरची किंमत ७०६ रुपये होती
घरगुती एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १ एप्रिल २०१९ रोजी ७०६.५० रुपये होती, जी २०२० मध्ये ७४४ रुपये, २०२१ मध्ये ८०९ रुपये आणि २०२२ मध्ये ९४९.५० रुपये झाली आहे. यावर्षी १ मार्च रोजीपासून ही किंमत १०५३ रुपयांवरून आता ११०३ रुपयांपर्यंत वाढली आहे.
सबसिडीमध्ये लक्षणीय घट
गेल्या काही वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. एलपीजीवरील एकूण सबसिडी गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. चार वर्षांत सरकारने दिलेल्या एलपीजीवरील सबसिडीच्या तपशीलावरून असे दिसून येते की, २०१८-१९ मध्ये ३७,२०९ कोटी रुपये सबसिडी होती आणि २०१९-२० मध्ये ती २४,१७२ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये ११,८९६ कोटी रुपये आणि २०२१-२२ मध्ये १८११ कोटी रुपये झाली आहे.