( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी घोटलवाडी येथे शुक्रवारी रात्री मृतअवस्थेत बिबट्या सापडला आहे. वाहनाच्या धडकेमुळे हा बिबट्या मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वनविभागाने पंचनामा करून आज शनिवारी दुपारी या मृत बिबट्याला अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांमध्ये वाशी पंचक्रोशी मध्ये मृत बिबट्या सापडल्याची ही दुसरी घटना असल्याचे स्पष्ट होत आहे. घोटलवाडी येथे रस्त्यापासून २०० मीटर आतमध्ये मृत बिबट्या सापडला. मिळून आलेल्या या बिबट्याच्या तोंडाजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे तो मृत झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. शुक्रवारी घोटलवाडी येथे काही ग्रामस्थांना दुर्गंधीचा वास येत होता. यावेळी आजूबाजूला पहाणी केली असता एक बिबट्या मृता अवस्थेत दिसून आला. याची माहिती ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी देवरुख वनविभाग कार्यालयाला दिली यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याच्या पंचनामा केला आहे. तर शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले.
संगमेश्वर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार असलेले वनपाल नानू गावडे, वनरक्षक आकाश कडुकर, राजाराम पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर शनिवारी दुपारी नजीकच्या ठिकाणी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. हा बिबट्या पूर्ण वाढीचा असून मादी जातीचा असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.
मात्र नक्की वाहनाच्या धडकेतूनच या बिबट्याचा मृत्यू झाला की अन्य काही कारण आहे याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा होत असून तर्कवितर्क लढविले जात आहेत. या दशक्रोशी मधील बिबट्या मृत होण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे यासारख्या चर्चा होत आहेत.