(मुंबई)
निवडणूक आयोगाचा निर्णय अनपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने निकाल देण्याची घाई करण्याचे कारण नव्हते. परंतु निवडणूक आयुक्त केंद्र सरकारचे गुलाम झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लालकिल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली व्यक्त करून देशात बेबंदशाही सुरू झाल्याची घोषणा करावी, असा संताप उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या निकालामुळे त्या चोरांना आज अत्यानंद झाला असेल, पण तो जास्त काळ टिकणार नाही. त्यांना वाटत असेल की शिवसेना संपली. पण शिवसेना इतकी लेचीपेची नाही. शिवसैनिकांनो, शिवसेनाप्रेमींनो मी खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
We will surely go to the Supreme Court against this EC order. We are sure that the SC will set aside this order and that the 16 MLAs will be disqualified by SC: Uddhav Thackeray on EC order that “Shiv Sena” name & “Bow & Arrow” symbol to be retained by Eknath Shinde faction pic.twitter.com/Iqt5VnGUyO
— ANI (@ANI) February 17, 2023
गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतावर जर निकाल यायला लागला तर उद्या कोणीही पैसेवाला व्यक्ती लोकप्रतिनिधींना विकत घेऊन मुख्यमंत्री वा पंतप्रधानही होऊ शकेल. मिंधे गटाला मांडीवर घेतलेल्या पक्षाची समोरासमोर येऊन लढण्याची हिंमत नाही. इतके दिवस विधानसभा, महापालिका निवडणुका ते घेत नव्हते. पण आता ज्या अर्थी हा निकाल आला आहे, त्या अर्थी एक दोन महिन्यात महापालिका निवडणुका ते घेतील. यांना मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या समोर उभी करायची आहे. आज शिवसेना आणि धनुष्यबाण त्यांना दिले. पण माझ्याकडे साक्षात शिवसेनाप्रमुखांनी पूजलेला आमच्या देव्हा-यातला धनुष्यबाण आहे ते तो कसा घेऊ शकतील. आज पक्षाचे नाव आणि चिन्ह घेतले आहे. उद्या ते मशाल हे चिन्हही काढून घेतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र असे असले तरी ख-या धनुष्यबाणाचे तेज काय असते ते जनता यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र धृतराष्ट्र नाही !
महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही. रामायणात धनुष्यबाण राम आणि रावण दोघांकडे होता. पण विजय शेवटी रामाचाच झाला. कौरव शंभर होते तरी पांडव काही हरले नव्हते. विजय हा सत्याचाच होत राहिला आहे. अनेकांना हा अत्याचार, अन्याय मान्य नाही. जनता लोकशाहीचे वस्त्रहरण खपवून घेणार नाही. भाजपचे मंत्री म्हणत होते, धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील म्हणत होते की धनुष्यबाण त्यांनाच मिळणार. इतकी मोठी माणसे आधीच सगळे सांगत होती. त्यामुळे हा कट होता का? असा प्रश्न उपस्थित होतो. यांना वाटत असेल की असे ओरबाडून त्यांना धनुष्यबाण व पक्ष मिळेल, तर तसे होणार नाही. महाराष्ट्रात मोदी चालत नाहीत. म्हणून यांना शिवसेनाप्रमुखांचा फोटो चोरावा लागतो. बाणही चोरावा लागतो. पण नामर्दांनो चोरी पचणार नाही. जनता पूरेपूर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.