(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात औषधालय, टेस्ट लॅबच्या खिडकी बाहेर तोबा गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. दररोज रुग्णांची मोठी गैरसोय होत असुन या आवारात पिण्याचे पाणी देखील जवळ उपलब्ध नाही. एका कोपऱ्यात पाण्याची मशीन ठेवलेली दिसून येते. रूग्णालयातील स्वच्छतागृहात देखील दुर्गंधी येत असते. अशा अनेक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रुग्णालयांत येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे.
जिल्हयातील रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याला प्रशासनाला मुहूर्त मिळेना झाला आहे. अनेक वर्षांपासून शासनाकडून रिक्त पदे भरली जात नसल्याने रुग्णालयात जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना सुविधा मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. रुग्णांची हेळसांड होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा रूग्णालयात येणाऱ्यांची संख्या पाहता आवश्यक मनुष्यबळच नसल्याचे चित्र आहे.
या रूग्णालयात नऊ तालुक्यातील नागरिक येत असतात. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ फी आकारली जाते, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शासकीय रुग्णालयाचा आधार असतो. मात्र जिल्हा रुग्णालयाची अशी अवस्था असेल तर रुग्णांनी जावे तरी कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रूग्णालयातील डॉक्टरांनी ज्या टेस्ट सांगितलेल्या असतील त्यातील ठराविक दोन ते तीन टेस्ट जिल्हा रुग्णालयात होतात. बाकीच्या टेस्ट बाहेर खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागतील असे सांगितले जाते. या टेस्ट जर खाजगी लॅबमधून केल्या तर अव्वा के सव्वा खर्च सांगितला जातो. दुसरीकडे टेस्ट करणे आवश्यक असते. एकूणच यातून खासगी डॉक्टरांची चांदी होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना जर खाजगी लॅबमधून टेस्ट करायला सांगितल्या जात असतील तर “जिल्हाचे रूग्णालय” नेमके आहे तरी कशासाठी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रुग्णालयातील प्रत्येक खिडकीवर होणारी गर्दी पाहून येणारे नागरिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करत असतात. या खिंडक्यांच्यासमोर रुग्णांसह नातेवाईकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नोंदणी, तपासणी, आवश्यकतेनुसार एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन अशा चाचण्या करणे तसेच औषधे घेणे या प्रक्रियेसाठी कमीत कमी प्रतिक्षा कालावधी असावा व नागरिकांचा वेळ वाचावा यादृष्टीने आवश्यक ते बदल करण्याकडे जिल्हा आरोग्य प्रशासन व स्थानिक आमदार लक्ष देणार का? असा सवाल ही नागरिकांमधून विचारला जातो.
तासनतास ताटकळत राहावे लागते उभे
सकाळ पासून रांगेत ताटकळत उभे राहून त्रास सहन करावा लागतो. त्यातील काही टेस्ट होणार नसतील तर पूर्ण दिवस या प्रक्रियेमध्ये जात असतो. पर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी आलेला असेल तर या टेस्ट करण्यात पूर्ण दिवस जात असल्याचेही समजते. गरोदर महिला देखील या रांगेत उभ्या असल्याचे दिसून येत असते.