(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या धमकीची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारला प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारणा केली असता, यावर मी कुठलेही भाष्य करणार नाही, असे अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबाबत प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला जवळपास दोन वर्षांआधीही सांगितले होते. त्यामुळे आताही मी त्या शपथविधीवर काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. सोबतच ज्या लोकांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचा कट रचला होता, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.