नवी दिल्लीः करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट हा जगातील ९ देशांमध्ये आढळला आहे. भारतात आतापर्यंत या डेल्टा प्लस व्हेरियंटचे २२ रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील जळगाव आणि रत्नागिरीत आहेत. याशिवाय केरळच्या पलक्कड आणि पथनमथिट्टा जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशात भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले.
देशात करोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. अशातच करोनाच्या तिसऱ्या लाटेने आता चिंता वाढवली आहे. देशावर करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे संकट घोंगावत आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक घातक ( delta plus variant ) असल्याचं बोललं जात आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.