(मुंबई)
गाडीचालक दारूच्या नशेत आहे का ? हे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस सक्तीने ‘ब्रेथ अॅनालायझर’ चाचणी करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मे.सत्र न्यायालयाने दिला आहे. दुचाकीचा चालक दारूच्या नशेत नसल्याचे आढळले होते. मग दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची ‘ब्रेथ अॅनालायझर’ चाचणी करण्याचे काहीही कारण नव्हते, असे मत नोंदवत मे.न्यायालयाने पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची निर्दोष सुटका केली.
आरोपी प्रभाकर सोमवंशी हा २४ फेब्रुवारी २०१३ रोजी शीव-ट्रॉम्बे रोडवर दुचाकीवरून आपल्या भावासोबत जात होता. या वेळी वाहतूक पोलिसांनी दुचाकी थांबवली आणि चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. त्या वेळी चालकाकडे लायसन्स नव्हते. त्यामुळे दोघेही दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्वप्रथम चालकाची ‘ब्रेथ अॅनालायझर’ चाचणी केली. त्यात तो दारूच्या नशेत नसल्याचे सिद्ध झाले.
त्यानंतर सोमवंशीला चाचणीबाबत सांगताच त्याने चाचणी करण्यास स्पष्ट नकार दिला. या वेळी वाद होऊन सोमवंशीने दोघा वाहतूक पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या प्रकरणी सोमवंशीविरुद्ध भादंवि कलम 353, 332 यांसह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तथापि, कथित मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे पोलिसांनी सादर केले नाहीत. याआधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.पी. मेहता यांनी सोमवंशीची निर्दोष सुटका केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर आरोपीची वैद्यकीय तपासणी केली होती. तर मग रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सादर करणे हे सरकारी पक्षाचे कर्तव्य होते. मात्र हा अहवाल सादर करण्यात आला नाही, यावरूनच त्या दिवशी आरोपीने मद्यप्राशन केले नव्हते हे सिद्ध होते, असेही न्यायाधीशांनी नमूद केले.
‘ब्रेथ अॅनालायझर’ चाचणी करण्यास नकार देणे हा काही कायदा वा नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा ठरत नाही. वास्तविक, वाहतूक पोलीस ही चाचणी करण्यासाठी गाडीचालकावर कुठल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही.