(संगमेश्वर / प्रतिनिधी )
वेस्टर्न, हीप-हॉप च्या काळात शास्त्रीय नृत्याकडे वळणारे फार कमी लोक दिसून येतात. तरीही काही कलोपासकांनी शास्त्रीय संगीताची साधना करून आपली संस्कृती, आपली कला जतन केली आहे. सौ. स्कंधा परेश चितळे यांनी कथ्थक नृत्यालंकार ही पदवी नुकतीच प्राप्त केली आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरांवरून अभिनंदन केले जात आहे.
लहानपणापासून त्या शास्त्रीय कथ्थक नृत्याचे शिक्षण घेत आहेत. देवरूखच्या गुरू नृत्यालंकार सौ. शिल्पाताई भिडे-मुंगळे यांच्याकडे त्या कथ्थक नृत्याचे शिक्षण घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या कोल्हापूर येथील देवल क्लब या केंद्रावर त्यांनी अलंकार साठी परीक्षा दिली आणि अलंकार ही पदवी प्राप्त केली. स्कंधा चितळे गेली १० वर्षे गुरू स्कंधा चितळे चिपळूण मधे नृत्य मल्हार कथ्थक अकादमी नावाने नृत्याचे धडे देत आहेत. चिपळूण सोबतच कुंभार्ली, खेर्डी येथेही त्यांचे क्लासेस चालतात. तसेच रत्नागिरी, दापोली, गुहागर येथून मुली कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यासाठी चिपळूणात येतात.
चिपळूण तसेच विविध ठिकाणी विविध तालुक्यांमध्ये स्कंधा चितळे यांचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नुकताच कर्णेश्वर महोत्सव पार पडला. त्यातही स्कंधा चितळे यांचा कलादर्पण हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर झाला. रसिकांनी त्यांच्या नृत्याला विशेष पसंती दर्शवली आहे.
शास्त्रीय नृत्य शिकत असताना आपल्या गुरुवरील विश्वास, जास्तीत जास्त रियाज करण्याची तयारी, सातत्य या गोष्टी असायला हव्या. शास्त्रीय संगीताचा ज्ञानाचा सागर खूप मोठा असल्याने शिक्षण ही कधीच न संपणारी एक प्रक्रिया आहे. वेळकाळ न पाहता संगीत साधनेत रमता आले पाहिजे. माझ्या गुरू नृत्यालंकार सौ. शिल्पाताई भिडे-मुंगळे , देवरुख मेहनत, नृत्यसाधना, पती परेश चितळे, आई प्राची गानू तसेच सर्व संगीत साथीदार या सर्वांमुळे हे यश मिळाल्याचे स्कंधा चितळे यांनी सांगितले.