(रत्नागिरी)
रत्नागिरीतील अंतु बर्वाची कथा मांडताना पु. ल. देशपांडे यांनी येथील नागरिकांचा सन्मान केला आहे. येथे आल्यावर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या वैचारिक संपन्नतेचा अनुभव आला. येथील ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. शहरातील किल्ला येथील श्री भागेश्वर विद्यामंदिर शाळा क्र. 9च्या शतक महोत्सवाचा सांगता समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, मरिनर दिलीप भाटकर, सीए श्रीकांत वैद्य, माजी मुख्याध्यापक तु. गो. सावंत, माजी शिक्षिका शुभदा साठे आदी उपस्थित होेते.
धनंजय कुलकर्णी पुढे म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी येथे प्रथम मराठी शाळा बांधली आणि मग मंदिर उभारले. यावरूनच त्यांची शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी दिसून येते. येथील रम्य परिसरात शिक्षण घेण्याचे भाग्य विद्यार्थ्यांना लाभले आहे. येथे घडलेला प्रत्येक विद्यार्थी नररत्न आहे.
डॉ. कद्रेकर म्हणाले की, आपण विचार मराठीतून करतो म्हणून प्राथमिक शिक्षणही मराठीतूनच घेतले पाहिजे. मराठीतून शिक्षण घेतले म्हणजे विद्वत्ता कमी होते असे काही नाही. मराठीतून शिकलेली मुले देश-परदेशात नाव कमावत आहेत. माजी मुख्याध्यापक तु. गो. सावंत म्हणाले की, शिक्षणमहर्षींच्या इंग्रजी माध्यमांचा शाळांमुळे मराठी माध्यमाच्या शाळा मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंताजनक आहे. यामुळे इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मराठीतून सक्तीचे करावे.
यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून 65 वर्षावरील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्राजक्ता कळबंटे यांनी केले. सूत्र संचालन संतोष ढोले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जितेंद्र शिवगण, संदेश कीर, निलेश जगताप, नितीन सुर्वे, स्वरुप बापार्डेकर, निकिता जगताप, पूनम हातखंबकर, आशिष मोरे, निलिमा सावंत व सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.