(रत्नागिरी)
विकासकामांमध्ये जरी रत्नागिरी शहर पहिल्या ५ क्रमांकामध्ये नसले तरी एका ठिकाणी मात्र देशात पाचव्या क्रमांकावर येण्याचा मान रत्नागिरी शहराला प्राप्त झाला आहे. तेही चांगल्या कामात नव्हे बर का? ज्यामुळे आपल्या आयुष्याचे अनेक तास आपण फुकट घालवतो आणि पैशाचा तर काडीचाही उपयोग होत नाही अशा मोबाईल गेमिंग प्रकारात रत्नागिरी शहर देशात पाचव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच रत्नागिरीत बेरोजगारी किती आहे हेही यावरून दिसून येते. रिकामटेकड्यांच प्रमाण वाढलंय. सध्या तरुण, तरुणी, लहान मुल असे अनेक जण या गेमिंगमध्ये कायम डूबलेलेल असल्याने असा अहवाल आला आहे. म्हणून तर आज देशात रत्नागिरी शहर पाचव्या स्थानावर आहे. गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीगच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
महाराष्ट्रातून रत्नागिरी व नागपूर ही गेमिंगची प्रमुख केंद्रे ठरत आह़ेत. राज्यानुसार दार्जिलिंग (पश्चिम बंगाल), मुर्थल (हरियाणा), बिकानेर (राजस्थान), मुरादाबाद आणि लखनौ (उत्तर प्रदेश), रत्नागिरी व नागपूर (महाराष्ट्र) कूर्ग (कर्नाटक), अंबूर (तामिळनाडू) ही शहरे गेमिंगमध्ये अग्रेसर ठरली आहेत.
लुडो विन, क्लास गेमची आधुनिक, कौशल्य आवृत्ती रत्नागिरीत लोकप्रिय असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मोबाइल प्रीमियर लीगच्या अहवालानुसार, हे निष्कर्ष भारतीय मोबाइल गेमिंग क्षेत्रात उदयास आलेल्या नवीनतम ट्रेंडशी सुसंगत आहेत. वेगवान इंटरनेट कव्हरेज, स्मार्टफोनची उपलब्धता आणि आकर्षक गेमिंग प्लॅटफॉर्मची उपलब्धता, यामुळे या शहरांमध्ये गेमिंगची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.
रत्नागिरीसारखे छोटे शहर ऑनलाईन गेमींग प्लॅटफॉर्मवर देश पातळीवर अचानक उच्चस्थानी पोहचल्याचे निरीक्षण अनेक पालक, समुपदेशक व शिक्षण संस्थांना विचार करायला लावणारे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलचे प्रमाण वाढले. त्यानंतर मोबाईलची सवयच झाली. पालकांचे मुलावर नियंत्रण नसल्याने गेमिंगचे प्रकार वाढीस गेले आणि त्याचेच हे द्योतक असल्याचे काहींचे म्हणणे आहे.