(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे पहिल्या सागर महोत्सवाचा दुसरा टप्पा उद्या शनिवारपासून सुरू होत आहे. यामध्ये वाळूशिल्प प्रदर्शन, खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची अभ्यासपूर्ण सफर असे विविध कार्यक्रम होणार आहेत. वाळूशिल्प व भेट कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी झाली असून याकरिता आसमंत फाऊंडेशनचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी अपार मेहनत घेतली आहे.
आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी, विवांत अनटेम्ड अर्थ फौंडेशन आणि कोस्टल कॉन्सरवेशन ग्रुप या सहयोगी संस्थांनी प्रथमच सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात व्याख्याने आणि माहितीपट गोगटे कॉलेजमध्ये दाखवण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष किनारा भेट आयोजित केली आहे.
२१ ला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये किनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील कांदळवन सफर हेमंत कारखानीस, संतोष तोसकर व संजीव लिमये घडवतील. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. वाळूशिल्प भाट्ये किनाऱ्यावर पाहता येतील.
सागर महोत्सवानिमित्त दि २१ रोजी संपूर्ण दिवस मत्स्यालय, मत्स्य संग्रहालय आणि मत्स्य शेती फार्म पाहण्यासाठी सगळ्यांकरिता विनामूल्य खुलं ठेवण्यात येणार आहे. याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा.
यासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन मो. नं. 9970056523 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.