(मनोरंजन)
स्टार अभिनेते रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावले आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेले आहे. या चित्रपटाला मोठे यश मिळताना दिसत असून, आता सर्वात जास्त कमाई करणारा ‘सैराट’ पाठोपाठ ‘वेड’ दुसरा चित्रपट ठरला आहे.
‘वेड’ चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसांतच नवे विक्रम रचायला सुरुवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला, तर रितेश देशमुख यांचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणा-या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
#Marathi film #Ved is now the SECOND HIGHEST GROSSING #Marathi film, after #Sairat… As expected, biz doubles on [third] Sat [vis-à-vis Fri], expect big gains on Sun again… This one refuses to SLOW DOWN… [Week 3] Fri 1.35 cr, Sat 2.72 cr. Total: ₹ 44.92 cr. pic.twitter.com/fTBULiGa8l
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2023
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या अहवालानुसार वेड हा सर्वांत जास्त कमाई करणा-या मराठी चित्रपटांच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहे, तर या यादीत पहिला क्रमांक ‘सैराट’चाच आहे. या चित्रपटाने शुक्रवारी १.३५ कोटींची कमाई केली, तर शनिवारी ‘वेड’ची कमाई २.७२ कोटी आहे, तर या चित्रपटाने शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कितीतरी पटीने जास्त कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला आहे.
या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, यातील संवाद, गाणी हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वेड प्रदर्शित होऊन १५ दिवस उलटून गेली, तरी या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. रोज थिएटरमध्ये तुफान गर्दी होत आहे. त्यामुळे चित्रपटाचा गल्लाही चांगलाच जमत आहे.
‘वदे’ची कथा सत्या (रितेश देशमुख) आणि निशा (जिया शंकर) यांच्याभोवती फिरते. सत्या आणि निशा यांचे एकमेकांवर प्रेम आहे, परंतु कौटुंबिक कारणांमुळे ते वेगळे झाले आहेत. निशाचे दुसऱ्याशी लग्न होते आणि सत्याला तिच्या आठवणीत दारूचे व्यसन लागते. दुसरीकडे, सत्याच्या शेजारी राहणारी श्रावणी (जेनेलिया डिसूझा) त्याच्यावर प्रेम करते. पण सत्याला याबद्दल काहीच माहिती नसते. मात्र, नंतर दोघेही लग्न करतात पण सत्याला अजूनही निशाची आठवण येत असते. याच कारणामुळे तो क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघून गेला. कथेत दाखवण्यात आले आहे की जेव्हा श्रावणीला वाटते की सत्या तिच्यावर कधीही प्रेम करणार नाही, तेव्हा ती त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेते. पण इथे ट्विस्ट आहे. सत्याला श्रावणीवरील त्याच्या प्रेमाचे महत्त्व कळते आणि चित्रपटाचा शेवट आनंदी होतो.
वेड चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले असून, चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहांत तुफान गर्दी केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून चित्रपटगृह हाऊसफूल्ल होत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कमाई ५० कोटींच्या आसपास गेली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे, असे सांगितले जात आहे.