(देवरूख / सुरेश सप्रे)
शिवसेना फुटीचे लोण सर्वत्र दिसत असताना ते जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत पोहोचले आहेत. संगमेश्वर तालुक्यातही शिंदे गटाने जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तर तालुका प्रमुख प्रमोद पवारांसह काही जणांना गळाला लावत शिंदे गटात सामिल करून घेत जोरदार धक्का दिला आहे.
या आधी १० वर्षे आमदारकी भोगलेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते यांसह शिंदे गटाचा हात धरला व आता तालुका प्रमुख यांनी प्रमोद पवार आपल्या काही निवडक सहकारी यांचेसह ना. सामंतांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेला रामराम करीत शिंदे गटात सामील झाल्याने हे दोन्ही नेते शिवसेना फोडण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसले.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला निर्माण करणारे माजी मंत्री रविंद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून तालुक्यातील हा अभेद्य गड कायम रहावा यासाठी तसेच खरी शिवसेना हिच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे असे दाखविणेचा ते पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे माजी मंत्री रविंद्र माने व माजी आम.सुभाष बने यांसह संर्पक प्रमुख राजू महाडीक हे शिवसैनिकांना आपल्याकडेच ठेवणेसाठी फिल्डींग लावली असतानाच तालुका प्रमुख पदावर विराजमान होवून जिल्ह्यात सेनेच्या इतिहास विक्रमी २७ वर्षे तालुका पदावर असलेले मराठा समाजाचेच प्रमोद पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुका शिवसेनेत खळबळ उडाली. तर यानंतर एकही निष्ठांवत शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करू नये यासाठी या माने-बने-महाडीक त्रयीने कंबर कसली आहे. मात्र प्रमोद पवारांचे राजिनाम्यानंतर लगेचच नविन तालुका प्रमुखांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना १५ दिवस होवून गेले तरी नवीन तालुका प्रमुख पदाची घोषणा झाली नसल्याने कार्यकर्तेंच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या पक्षात तालुक्यात अनेक दिग्गज अनुभवी नेते असूनही या पदावर अजूनही निवड होत नसलेने सैनिकांच्यामध्ये चलबिच वाढताना दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे सेनेने शिंदेगटासह सर्वच पक्षांना मागे टाकत आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. आता ठाकरे गटाची ताकद वाढविण्यासाठी रवींद्र माने, सुभाष बने व सहसंपर्क प्रमुख राजू महाडीक तालुक्यांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार ठाकरे गटाचेच दक्षिण जिल्हाप्रमुख नियुक्त आहेत. मात्र प्रमोद पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने रिक्त तालुका प्रमुख पदावर अजुनही नियुक्ती केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यापुर्वी तालुक्यात सेनेच्या स्थापनेपासून १९८६-८७ सालापासून मागील ३६ वर्षात तीन तालुका प्रमुख झाले. त्यात पहिले तालुका प्रमुख हे रविंद्र माने होते. ते १९९०ला आमदार झाल्यावर ती जबाबदारी दिलिप जाधवांकडे आली. १९९७चे सुमारापासून गेली २७ वर्षे या पदावर प्रमोद पवार होते. हे तीनही उमदेवार मराठा समाजातून आलेले होते.
शिवसेनेचा रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता काही अपवाद वगळता आमदार, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख या पदांवरती मराठा समाजातील व्यक्तीकडेच ही पदे दिली गेली असल्याची वस्तूस्थिती दुर्लक्षित करता येत नाही. जिल्हा व तालुक्यात बहुसंख्य असलेल्या व शिवसेनेशी कायम एकनिष्ठ असलेल्या वा राहीलेल्या कुणबी समाजातून या पदावर निवडीसाठी कधीच प्राधान्य दिले गेले नाही. ही वस्तूस्थिती पहाता नवीन नेमणुका करताना व पक्ष या कठिण कालखंडातून जात असताना तालुका प्रमुख पदावर जन सामान्यांच्या कामाची जाण असलेला, सर्व समाजासह कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन जाणारा, आक्रमक नेतृत्व असलेला उमेदवार असावा यासाठी चाचपणी सुरू असली तरी अद्यापही हे पद रिक्त राहील्याने शिवसैनिंकासह जनतेतून विविध चर्चांना पेव फुटले आहे.