( मुंबई )
झारखंडमध्ये ‘श्रद्धा हत्याकांड’ ची पुनरावृत्ती झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहाचे चक्क 50 तुकडे करून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता झारखंड हादरून निघालं आहे.
सविस्तर वृत्त असे की, झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील बोरिया येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे लोखंडी कटरने तुकडे केले आणि या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते पोत्यामध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. मृतदेहाचे सात ते आठ तुकडे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांकडून श्वान पथकाच्या साहाय्याने मृतदेहाचे अवशेष शोधण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दिलदारसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर् आरोपींची चौकशी सुरु आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.
मृत तरुणीचं नाव रूबिका पहाडीन असल्याची माहिती समोर येत आहे. प्रियकर दिलदार अंसारीने रुबिकाची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. रुबिनाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपी दिलदारने लोखंड कापण्याच्या कटरने मृतदेहाचे तुकडे केले. दिलदार आधीच विवाहित असल्याचं म्हटलं जात आहे. रुबिका दिलदारची दुसरी पत्नी असल्याची चर्चा आहे. रूबिका आणि दिलदार पती-पत्नी असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु असून त्यातून अधिक माहिती समोर येईल. दरम्यान, दिलदारने नातेवाईकांसोबत मिळून रुबिकाची हत्या केली, अशी माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.
झारखंडमधील बोरीओ भागात येथील बांधकाम सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रामागे शनिवारी सायंकाळी एक पाय आणि मानवी शरीराचे दोन तुकडे आढळून आले. या परिसरात एकच खळबळ उडाली होती. कुत्रे मृतदेहाच्या तुकड्यांचं लचके तोडत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बोरीओ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगन्नाथ पान, एएसआय करुण कुमार राय यांनी बोरीओ येथे घटनास्थळी जाऊन तपास केला. तपासात पोलिसांना अंगणवाडी केंद्रापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या बंद घरातून मानवी मृतदेहाचे अनेक अवशेष गोणीमध्ये भरलेल्या स्थितीत सापडले. आरोपी दिलदारने मृतदेहाची ओळख पटवली. शनिवारी रात्री उशिरा बोरिओ पोलीस अधीक्षक अनुरंजन किस्पोटा यांच्या नेतृत्वाखाली आरोपी दिलदार सोबत त्याच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन धारदार शस्त्रंही जप्त केली आहेत.