(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी येथे गोठ्याला आग लागून गोठा जळून खाक झाला आहे. तर गोठ्यातील 5 जनावरे होरपळली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुरडे-शिंदेवाडी येथील शेतकरी शांताराम शिबे यांच्या मालकीच्या गोठ्याला रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत गोठ्यात नुकताच भरलेला पेंढा जळून खाक झाला. तसेच गोठ्यातील दोन बैल, दोन गाई व एक वासरू अशी जनावरे होरपळली.
प्रकाश शिबे हा योग्य वेळी तिथे पोहोचल्यामुळे गुरांची दावी तोडून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जनावरे बचावली. शिबे यांचा मुलगा प्रकाश शिबे हा गोठ्याकडे गेल्यामुळे ही घटना उघडकीस आली. गोठ्यामध्ये सुमारे 20 ते 25 मण भात पोत्यात भरून ठेवले होते. ते देखील या आगीत जळून खाक झाले. तसेच या गोठ्याच्या बाजूला असलेल्या बाळू खामकर यांच्या शेतातील भाताची उडवीही आगीत जळून खाक झाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.