(राजापूर / प्रतिनिधी)
मोबार्ईलवरील गेमच्या अति आहारी गेल्याने रागाच्या भरात तरुणाने विषारी औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे घडली. पुरन कुसिंह थापा (21, नैनिताल, उत्तराखंड ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 4 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरन थापा हा विखारे गोठणे राजापूर येथील अनंत मराठे यांच्या आंबा बागेची राखण, साफसफाई व फवारणीचे कामासाठी होता. 3 डिसेंबर रोजी पुरन रात्री 9.30 वा. च्या सुमारास मोबाईलवर ‘फ्रि फायर’ नावाचा गेम खेळत होता. मात्र गेम खेळताना आपण हरणार याची त्याला जाणीव झाली. हा राग अनावर झाल्याने पुरन याने बागेत गवत मारण्यासाठी असलेले विषारी औषध प्यायले. थोडया वेळाने त्याच्या तोंडातून फेस येवू लागला.
त्याला प्राथमिक उपचारासाठी राजापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत अधिक खालावल्याने 108 रुग्णवाहिकेने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना 4 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.